Kidney Stone Prevention : जास्त मीठ खाल्याने होऊ शकतो किडनी स्टोनचा त्रास, करा हे सोपे उपाय
किडनी स्टोनमुळे लोकांना अत्यंत वेदना सहन कराव्या लागू शकतात. स्टोनचा आकार वाढल्यास किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. दैनंदिन जीवनशैलीत काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास किडनी स्टोनपासून आयुष्यभर दूर राहू शकता.
नवी दिल्ली – तरूणांमध्ये किडनी स्टोनची (kidney stone) समस्या झपाट्याने वाढत आहे. जेव्हा विरघळलेली खनिजे मूत्रपिंडात जमा होतात आणि शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा एक दगड तयार होतो. सुरुवातीला, लोकांना त्याची लक्षणे दिसत नाहीत, मात्र दगडाचा आकार वाढतो तेव्हा वेदनादायक स्थिती उद्भवते. किडनी स्टोनवर योग्य उपचार न केल्यास लघवीच्या समस्या, युरिन इन्फेक्शन (urine infection) आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते. त्याबद्दल गाफील राहणे अजिबात (do not neglect) चांगले नाही.
किडनी स्टोन नेमका कशामुळे होतो ? त्याची अनेक कारणे असू शकतात. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणून चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी हे असू शकते. एवढेच नव्हे तर जास्त मीठ खाल्ल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते. वैद्यकीय इतिहास, जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च यूरिक ॲसिडमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. कोणत्या पद्धतींचा अवलंब करून किडनी स्टोनच्या समस्येपासून दूर राहू शकतो हे जाणून घेऊया.
या उपायांनी किडनी स्टोनपासून होऊ शकतो बचाव
मीठ कमी खावे
एका अहवालानुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने तुमच्या लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे स्टोनचा धोकाही वाढतो. लोकांनी एका दिवसात 2300 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होत असेल त्यांनी रोज फक्त 1500 मिलीग्राम मीठ खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
खूप पाणी प्यावे
किडनी स्टोन टाळण्यासाठी लोकांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायाल्याने मूत्रपिंडात साचलेली अतिरिक्त खनिजे बाहेर टाकली जातात आणि किडनी स्टोनचा धोका कमी होतो. पाण्यात लिंबू किंवा थोडी साखर घालून प्यायल्यानेही तुम्ही किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करू शकता. प्रत्येकाने दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.
कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत
कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही किडनी स्टोनची समस्या टाळू शकता. दूध, दही, पनीर, सोयाबीन, बदाम आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. अशा पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या लघवीमध्ये कॅल्शियम जमा होण्याची शक्यता कमी होते आणि किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
चिकन आणि अंडी खाणे टाळावे
रेड मीट, चिकन, अंडी आणि सीफूडचे जास्त सेवन केल्याने यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोनचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ टाळावेत. मांसाहारापासून लांब रहावे आणि सकस व पौष्टिक अन्न सेवन करावे.
चॉकलेट कमी खावे
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण जास्त चॉकलेट, चहा आणि अक्रोड खाल्ल्याने देखील किडनी स्टोनचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींपासून लांब रहावे आणि आरोग्यदायी पदार्थ खावेत. या गोष्टींची काळजी घेतल्यास किडनी स्टोनची समस्या टाळता येते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)