Keeping Warm In Winters: रुम हीटर न वापरताही हिवाळ्यात रहा उबदार, करा ‘हे’ उपाय
थंडीच्या दिवसात उबदारपणासाठी बरेच जण हीटरचा वापर करतात, मात्र ते आरोग्याासाठी चांगले नसते. हीटरशिवायही अनेक उपाय तुम्ही करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला उबदार वाटेल आणि त्रासही होणार नाही.
नवी दिल्ली – थंडीचा कडाका वाढू लागताच सगळेजण स्वेटर, रजईमध्ये गुरफटून घेतात, किंवा हीटरचा (heater) वापर करतात. त्यामुळे उबदार तर वाटतं, पण हीटरच्या अती वापरामुळे आरोग्याचेही नुकसान होतं आणि वीजेचं बीलही वाढतं. थंडी पळवण्यासाठी हीटर वापरणे हा सर्वात सोपा उपाय आहे, पण त्याशिवायही काही उपाय (tips for winter) आहेत, ज्यामुळे तुम्ही उबदार (to keep warm) राहू शकतात. थंडी पळवण्यासाठी हीटरशिवाय अजून कोणते पर्याय आहेत, ते पाहूया.
1) गरम पाण्याच्या पिशवीने शेका
जर तुम्हाला खूप थंडी वाटत असेल तर हीटर ऐवजी गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला शेक बसेल आणि उशरीरही उबदार राहील. जर तुम्ही काम करत असाल तर गरम पाण्याची पिशवी मांडीवर किंवा पाठीमागे ठेवावी.
2) झोपण्याचा बेड उबदार करा
थंडीच्या दिवसात आपले अंथरुण-पांघरुणही थंड पडते, ते टाळण्यासाठी बेडवर एक जाड चादर पसरून त्यावर शाल पसरवा. यामुळे तुमचे अंथरुण उबदार राहील. तसेच झोपताना एक उबदार ब्लँकेट घ्या जेणेकरून थंडी जाणवणार नाही.
3) उबदार कपडे घाला
जर तुम्हाला खूप थंडी वाजत असेल तर शरीर उबदार ठेवणारे पूर्ण कपडे घाला. अंगात आधी थर्मल घालून त्यावर स्वेटर आणि जॅकेट घालू शकता, यामुळे थंडी वाजणार नाही व उबदार वाटेल. कपडे निवडतानाही लोकर, रेशीम यासारखे कापड निवडा, जे लवकर गरम होते व थंडीचा त्रास होत नाही.
4) हात-पाय पूर्ण झाका
शरीर उबदार ठेवणारे पूर्ण कपडे घालण्यासोबतच हातात व पायात मोजे घालावेत. तसेच कानटोपीचाही वापर करावा. तसेच थंड हवा बाधू नये यासाठी शालीचाही वापर करू शकता. केवळ बाहेर जातानाच नव्हे तर घरातही थंडीच्या चपला अथवा बूट घालावेत.
5) नियमितपणे व्यायाम करा
वर्कआऊट केल्याने आपण तंदुरुस्त तर राहतोच पण त्यामुळे शरीरातील उष्णताही कायम राहते. कार्डिओ व्यायाम आवर्जून करावा, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढेल आणि तुम्हाला उबदार वाटेल. मात्र खूप घाम येईस्तोवर व्यायाम करणे टाळावे, अन्यथा पुन्हा थंडी वाजू शकते.
6) घरी गालिचा किंवा कार्पेट घालावे.
हिवाळ्यात घराची फरशी अथवा लादी लवकर गार पडते व त्यामुळे जास्त थंडी वाजू शकते. अशा वेळी जमिनीवर कार्पेट किंवा गालिचा घालावा. ज्यामुळे चालताना पायांना थंड जमीनीचा स्पर्श होणार नाही.
7) गरम अन्न खावे
जे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतील व शरीर उबदार ठेवतील, अशा पदार्थांचा थंडीच्या दिवसात आहारात समावेश करावा. ड्रायफ्रुट्स, घरी तयार केलेला काढा, गरम मसाला चहा, अंडी, हाय प्रोटीनयुक्त पदार्थ, गरम सूप , यासारख्या पदार्थांमुळे शरीराला ऊब मिळते आणि आपण निरोगी राहतो.
8) उन्हात बसा / शेक घ्या
हिवाळ्याच्या दिवसात उन्हात बसण्याचा आनंद काही वेगळाच असतो. प्रत्येकाने दिवसातून थोडा वेळ तरी उन्हात बसले पाहिजे, त्यामुळे केवळ उबदारच वाटत नाही तर व्हिटॅमिन- डी हेही मिळते आणि आपण आजारी पडत नाही. बाहेर जाऊन उन्हात बसणे शक्य नसेल तर दिवसा घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून सूर्यप्रकाश घरात येऊ शकेल.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)