मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी घेता कृत्रिम स्वीटनर्सची मदत ? तर होऊ शकतात गंभीर आजार
अन्नातील साखरेचा वापर कमी करण्यासाठी कृत्रिम स्वीटनर वापरले जाते. मात्र ते आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरेलच असं नाही.
नवी दिल्ली : आजकाल लोकांचा आहारात साखरेचा (sugar) वापर कमी करण्याकडे कल असतो. त्याऐवजी ते कृत्रिम स्वीटनरचा (artificial sweetener) वापर करणे पसंत करतात. कृत्रिम स्वीटनरचा वापर काही नवीन नाही आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषत: ज्यांना आहारातील शुद्ध साखरेचे प्रमाण (control sugar intake) कमी करायचे आहे, ते याचा जास्त वापर करताना दिसतात. मात्र एक नवे संशोधन सूचित करते की झिरो-कॅलरी स्वीटनरमध्ये एरिथ्रिटॉल (erythritol) देखील असते, जे रक्त गोठणे, स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यांशी संबंधित आहे.
स्वीटनर संदर्भात झाले संशोधन
क्लीव्हलँड क्लिनिक लर्नर रिसर्च इन्स्टिट्यूटने नेचर मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर प्रकाशित केला आहे. आधीच हृदयविकाराचे रुग्ण असलेल्या लोकांमध्ये एरिथ्रिटॉलमुळे धोका दुप्पट कसा होऊ शकतो, हे त्या संशोधनातून स्पष्ट होते. त्यांच्या रक्तातील एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.
गेल्या काही वर्षांमध्ये एरिथ्रिटॉल सारख्या गोड पदार्थांचा वापर वाढला आहे, त्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन परिणामांवर अधिक संशोधन आवश्यक आहे, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सेंटर फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर डायग्नोस्टिक्स अँड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. स्टॅनले हेझन यांनी नमूद केले. या अभ्यासात आढळलेल्या जोखमीचे प्रमाण काही थोडेथोडके नव्हते.
हृदयविकार आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरते प्राणघातक
या अभ्यासात असेही आढळून आले की जे लोक आधीच हृदयविकार किंवा मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्यांच्या रक्तातील एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्याने त्यांना स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो. याव्यतिरिक्त, एरिथ्रिटॉलमुळे रक्तातील प्लेटलेट्सच्या अधिक सहजपणे गुठळ्या होऊ शकतात, जे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
एरिथ्रिटॉल हे क्लॉटिंगसाठी कारणीभूत आहे, असे दिसून येत आहे. साहजिकच, या विषयावर अधिक संशोधन आवश्यक आहे, परंतु सध्या, सावधगिरी बाळगली जाऊ शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले. आपले हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य एका दिवसात बिघडत नाही किंवा चांगलेही होत नाही. त्यामुळेच आपण काय खातो आणि तसेच हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणारे कोणते घटक आपल्या अन्नामध्ये लपले आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. यूएस आणि युरोपमधील 4,000 हून अधिक लोकांच्या रक्तात एरिथ्रिटॉलची उच्च पातळी आढळून आली, ज्यामुळे आता हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
एरिथ्रिटॉल म्हणजे काय ?
लो-कॅलरी, लो-कार्ब्स आणि केटो उत्पादने यामध्ये कृत्रिम स्वीटनरमध्ये, एरिथ्रिटॉलचा भरपूर वापर होतो, जो सामान्य साखरेचा पर्याय ठरू शकतो. ज्या लोकांना त्यांच्या आहारात साखर किंवा कॅलरीजचे सेवन कमी करू इच्छितात, त्यांना एरिथ्रिटॉल असलेली शुगर-फ्री उत्पादने ऑफर केली जातात, असे संशोधकांनी नमूद केले. एरिथ्रिटॉल 70 टक्के साखरेइतके गोड असते, पण ते कॉर्न आंबवून बनवले जाते. पण आपले शरीर एरिथ्रिटॉल योग्यरित्या पचवू शकत नाही, हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.