Corona | भारतात ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ची एंट्री, वैशिष्ट्य काय? लसीकरण झाल्यानंतरही जपूनच रहावं लागणार
BF.7 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण चीनमधील इनर मंगोलिया प्रांतात आढळला होता. आतापर्यंत हा विषाणू भारतासह, अमेरिका, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आदी युरोपियन देशात आढळला आहे.
नवी दिल्लीः चीनमध्ये (China) कोरोनाने कहर केलाय. तर भारतातदेखील नागरिकांना आता जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण चीनमध्ये ज्या BF.7 या व्हेरिएंटने (BF.7 Variant) हेदौस माजवलाय, त्याची भारतातही एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात (Gujrat) आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा व्हेरिएंट आहे. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
- BF.7 हा ओमिक्रॉनच्या BF.5चा सब व्हेरिएंट आहे. यात संसर्गाची क्षमता जास्त आहे तर इनक्युबेशन कालावधी कमी आहे.
- सब व्हेरिएंट BF.7 जास्त घातक ठरू शकतो, कारण ज्या लोकांचे लसीकरण झाले आहे, त्यांनाही याच्या संसर्गाचा जास्त धोका आहे.
- अहवालांनुसार, BF.7 व्हेरिएंटचा श्वसनयंत्रणेच्या वरील भागात संसर्ग होतो. त्यामुळे सर्दी, ताप, घशात खवखव, नाक वाहणे, अशक्तपणा, थकवा आदी लक्षणे जाणवतात.
- आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीराने पूर्वीच्या व्हेरिएंटसाठी जी प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या तयार केलेली असते, त्या यंत्रणेलाही नवा व्हेरिएंट सहजपणे बायपास करू शकतो.
- वेस्टमिंस्टर विद्यापीठातील तज्ज्ञ मनाल मोहम्मद यांच्या मते, BF.7 ने संक्रमित एक व्यक्ती 10 ते 18 व्यक्तींना संक्रमित करू शकते. आधीच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे 5 व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो.
- चीनमध्ये अचानकपणे वाढलेल्या रुग्णसंख्येमागेही BF.7 चा व्हेरिएंट आहे. आता जपान, अमेरिकेतही या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
- BF.7 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण चीनमधील इनर मंगोलिया प्रांतात आढळला होता. आतापर्यंत हा विषाणू भारतासह, अमेरिका, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आदी युरोपियन देशात आढळला आहे.
- केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरिएंट सप्टेंबर महिन्यातच भारतात आला होता. वडोदऱ्यात एका NRI महिलेला याची लक्षणं दिसली होती.
- ही महिला अमेरिकेतून वडोदख्यात आली होती. त्यानंतर ती महिला बरी झाली होती.
- आता गुजरातमधील वडोदरा आणि ओडिशात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
- गंभीर बाब म्हणजे, भारतात गेल्या 24 तासात 129 कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. देशात सध्या 3,408 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झालाय.