तो पुन्हा आलाय ! कोरोनाची बदलली लक्षणं; तुम्हालाही झालाय का त्याचा संसर्ग ? ही लक्षणं दिसल्यास व्हा सावध
राजधानीचे शहर दाट लोकवस्तीचे असल्याने येथे कोविड-19 ची प्रकरणे येत्या काही दिवसांत वाढण्याची अपेक्षा आहे, असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले. तसेच 'फ्लू' सारखी लक्षणे असलेल्या लोकांनी मास्क घालावेत आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा (corona cases increasing) धोका पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये त्याच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर देशभरातील रुग्णालयांमध्ये दोन दिवसांचे मॉक ड्रिल (mock drill) घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हेही दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले. व त्यांनी स्वतः मॉक ड्रिलचे निरीक्षण केले आणि हॉस्पिटलमधील (hospitals) कोरोनाच्या तयारीचा आढावा घेतला.
या तयारीत कोणताही निष्काळजीपणा तर होत नाही ना, हे तपासण्यासाठी मनसुख मांडविया यांनी डॉक्टरांच्या टीमशी चर्चा केली. कोरोनाच्या वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालयात काय तयारी करण्यात आली हे देखील मनसुख मांडविया यांनी तपासले. त्यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन नीट पाहणी केली व पुरेशी तयारी व पुरवठा आहे की नाही याचीही खात्री करून घेतली.
दरम्यान, राजधानीचे शहर दाट लोकवस्तीचे असल्याने येथे कोविड-19 ची प्रकरणे येत्या काही दिवसांत वाढण्याची अपेक्षा आहे, असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नमूद केले. तसेच ‘फ्लू’ सारखी लक्षणे असलेल्या लोकांनी मास्क घालावेत आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता देशभरात कडक कारवाई सुरू झाली आहे. रुग्णालयांमध्ये तपासाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यामागील काही मोठी कारणे आहेत. कारण,
– गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 5,880 रुग्ण आढळले आहेत.
– देशभरात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 35,199 वर पोहोचली आहे.
– कोरोनामुळे देशभरात एका दिवसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
– त्याच वेळी, देशभरात 3481 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.
कोरोनाची नवी लक्षणे काय आहेत ?
यावेळी पसरत असलेल्या कोरोना संसर्गाची लक्षणेही पूर्वीपेक्षा वेगळी आहेत. डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, तीव्र ताप येणे, सर्दी आणि खोकला ही कोरोनाची सामान्य लक्षणे दिसत आहेत. पण यावेळी त्वचेशी संबंधित लक्षणे, कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळ्यांना खाज येणे, डोळे चिकट होणे अशी लक्षणे समोर येत आहेत. कोरोना रुग्णांमध्ये ही नवीन लक्षणे दिसून येत आहेत.