कोविडमुळे पॅनिक ॲटॅक येण्याचा धोका, असा करा बचाव
पॅनिक ॲटॅक हा कोणत्याही पूर्व लक्षणांशिवायही होऊ शकतो. केवळ झोपतानाच हा त्रास होईल असे नाही, कुठेही बाहेर चालत असताना किंवा गाडी चालवतानाही पॅनिक ॲटॅक येऊ शकतो.
नवी दिल्ली – चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना (corona) विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही हाय अलर्टवर असून मास्क लावणे , बूस्टर डोस घेणे अनिवार्य करणे यासारह अनेक नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. जेव्हा कोणत्याही देशामध्ये कोविडचा (covid) आलेख वाढतो तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रकारची चिंता (stress) निर्माण होते. लॉकडाऊनची भीती मनात असतेच पण त्यासह या आजाराची लागण होण्याची चिंताही सतावू लागते.
आपल्याला संसर्ग झाला तर काय होईल? असे विचार मनात घोंगावू लागतात. मनात निर्माण होणारी निराशा आणि भीती याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. ज्यामुळे ॲंक्झायटी डिसऑर्डर (चिंता विकार) आणि पॅनिक ॲटॅक (panic attack) सारख्या समस्या उद्भवू शकतात.
आपल्या देशात कोरोनाच्या काही लाटांमध्ये गेल्या वेळी असे दिसून आले आहे की कोविडमुळे लोकांना चिंता आणि पॅनिक ॲटॅक सारख्या समस्यांचा त्रास होऊ लागला आहे. विनाकारण चिंता केल्यामुळे अनेक लोक ॲंक्झायटी डिसऑर्डरचे शिकार होतात. तसेच चिंता वाढली तर लोकांना पॅनिक ॲटॅकदेखील येऊ लागतात. यामध्ये हृदयाचे ठोके अचानक वाढणे, घाम येणे, घसा कोरडा पडणे आणि मळमळणे अशी लक्षणे दिसू शकतात. हा पॅनिक ॲटॅक 5 ते 15 मिनिटे टिकू शकतो.
पॅनिक ॲटॅक हा जीवघेणा नसतो, मात्र तो सतत आल्यास त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोणतीही पूर्व लक्षणे नसतानाही पॅनिक ॲटॅक येतात. हे फक्त झोपतानाच घडेल, असे आवश्यक नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे बाहेर चालताना किंवा गाडी चालवताना पॅनिक ॲटॅक येतो. तुम्ही काय विचार करत आहात आणि तुमच्या मनात बाहेर एखाद्या गोष्टीची भीती आहे का, यावर ते अवलंबून असते.
कसा करावा बचाव ?
– पॅनिक ॲटॅक टाळण्यासाठी तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता. रोज सकाळी उठून श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरते. त्यासाठी श्वासावर नीट लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घ्यावा व तो सोडावा. हा व्यायाम तुमच्या क्षमतेनुसार करावा.
– तुम्हाला पॅनिक ॲटॅक कोणत्या परिस्थितीत आला आहे, हेही लक्षात घ्यावे. एखाद्या विशिष्ट वातावरणात किंवा विशिष्ट जागी गेल्यावर पॅनिक ॲटॅक येत असेल तर त्यापासून लांब रहावे किंवा तेथे जाणे टाळावे.
– पॅनिक ॲटॅक येण्याचा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ तुम्हाला मदत करू शकतात. समुपदेशनाद्वारे ॲंक्झायटी डिसऑर्डरवर उपचार करता येतात
– कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची भीती किंवा काळजी असेल तर ती तुमच्या कुटुंबियांना सांगा. मनातील भीती शेअर केल्याने बऱ्याच वेळेस बरं वाटतं, ताण निवळतो.
– नकारात्मक बातम्यांपासून दूर राहा. टीव्हीवर फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करा आणि सोशल मीडियावर कमी वेळ घालवा.
– विनाकारण मानसिक ताण घेऊ नका.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)