पाऊस तर गेला पण…संशोधनातून डेंग्यूबाबत सर्वात मोठा धोका समोर
डेंग्यूची लस येण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार आहेत. एकीकडे डेंग्यूच्या लसीवर संशोधन सुरु असताना एका ताज्या संशोधनात डेंग्यूच्या विषाणूबाबत नवीनच माहीती समोर आली आहे.
नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : मान्सूनचा सिझन आल्हाददायक वातावरणासोबत अनेक आजारांना सोबत घेऊन येत असतो. पावसाळ्यातच अनेक साथीचे आजार थैमान घालत असतात. गेल्या काही वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण मुंबईसह अनेक गर्दीच्या शहरात वाढत आहेत. वाढत्या बकालीकरणामुळे डासांचे प्रमाणात वाढ होत असून त्यामुळे मलेरीया आणि डेंग्यू हे डासांद्वारे पसरणारे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. डेंग्यूच्या बाबतीत नवीन बाब संशोधनात उघड झाली आहे.
डेंग्यूच्या व्हायरसचा राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी अलिकडेच एक अभ्यास केला आहे. त्यात डेंग्यूचा व्हायरस उष्ण तापमानात अधिक धोकादायक होतो असे उघडकीस आले आहे. जेव्हा डेंग्यूचा व्हायरस ( DENV ) अधिक तापमानाच्या संपर्कात येतो तेव्हा अधिकच धोकादायक बनतो. हा अभ्यास दि फेडरेशन ऑफ अमेरिकन सोसायटीज ऑफ एक्सपिरिमेंटल बायोलॉजीत प्रसिध्द झाला आहे.
अभ्यासात काय आढळले
अभ्यासात असे आढळले की उष्ण तापमानामुळे डासांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतो. त्यामुळे माणसांमध्ये हा आजार डास वेगाने पसरवू शकतात. याचे कारण व्हायरसचा कमी असलेला इन्क्युबेसन पिरीयड आहे. उंदरावर केलेल्या प्रयोगात तापमानामुळे व्हायरसच्या प्रबळ जातीने त्यांचा रक्तात जास्त संक्रमण केले. त्यामुळे हृदय,लिव्हर आणि किडनी या महत्वाच्या अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.
डेंग्यू कसा होतो
डेंग्यू विषाणू पासून होणारा आजार असून एडीस एजिप्ती डासाची मादी चावल्याने तो मनुष्याला होतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहीतीनूसार शंभरहून अधिक देशात हा आजार आहे, अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम प्रशांत क्षेत्रात हा आजार पसरला आहे. या आजारात हलका किंवा तीव्र ताप, प्लेटलेट कमी होणे, उलट्या, डीहायड्रेशन, थकवा, सांधे दुखी, जुलाब आदी आजार होते.