मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
मधुमेहांच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. नाश्त्यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी अशा गोष्टी खाव्या, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढत नाही आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
आपले आरोग्य नीट राहण्यासाठी आपल्या आहारात नेहमी हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतो. त्यातच सकाळच्या नाश्त्यात नेहमी आरोग्यदायी नाश्ता करावा. ज्यामुळे आपल्या शरीरात दिवसभर काम करण्याची ऊर्जा राहते. अशातच मधुमेहांच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. नाश्त्यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी अशा गोष्टी खाव्या, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढत नाही आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल यांच्यानुसार मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढेल. त्यांनी नेहमी त्यांच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, हेल्दी आहार आणि फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करून घेत राहिल्याने तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
लिंबाचे रस आणि आवळा
मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळचा नाश्ता केल्यानंतर लिंबू किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. या पेयाच्या सेवनाने आतड्याचे आरोग्य सुधारते. यामुळे दिवसभर शुगर लेव्हल तर ठीकच राहीलच पण पचनही व्यवस्थित होत राहील.
दालचिनीचे पाणी
मसालेदार चहा बनवण्यासाठी दालचिनीचा वापर जास्त केला जातो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी कमी करायची असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यावे. याशिवाय हर्बल चहासोबत ही दालचिनीचे सेवन करू शकतात.
मोड आलेली कडधान्य
साखर नियंत्रित करण्यासाठी प्रोटीन डाएट हा खूप चांगला पर्याय मानला जातो. अशावेळी सकाळी नाश्ता म्हणून मोड आलेले कडधान्य उकडून त्यांचे सेवन करावे. कारण या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
मेथीदाण्याचे पाणी
मधुमेह असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी हा उत्तम पर्याय आहे, याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच दिवसभरामध्ये शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी एक चमचा मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ह्या मेथीच्या दाण्याचे सेवन करा. यामुळे रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात नियंत्रित करता येते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)