डॉक्टरांची कमाल… गर्भाच्या आतच भ्रूणाची यशस्वी हार्ट सर्जरी केली, शेप बदलून जीवही वाचवला; अशी झाली सर्जरी
या 28 वर्षीय गर्भवती महिलेचे तीन गर्भपात झाले होते. तिला जेव्हा तिच्या न जन्मलेल्या गर्भाच्या हृदयाची स्थिती खराब आहे असे सांगितले, तेव्हा ती बेशुद्ध झाली.
नवी दिल्ली : डॉक्टरांना बऱ्याच वेळेस देवाचा दर्जा दिला जातो. अनेक वेळा ते रुग्णावर अवघडात अवघड, क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया (surgery) किंवा उपचार करू त्याचा जीव वाचवतात. नुकतीच घडलेली एक घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. खरंतर राजधानी दिल्लीतल एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका महिलेच्या गर्भाशयात (inside womb) वाढणाऱ्या गर्भाच्या हृदयावर (heart) अवघ्या दीड मिनिटांत एक जटिल शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या अद्याप न जन्मलेल्या मुलाचे हृदय अगदी छोटसं, द्राक्षाएवढं होतं. त्याच्यावर बलून डायलेशन (Balloon Dilation) हे यशस्वीपणे करण्यात आलं. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे समजते.
या 28 वर्षीय गर्भवती महिलेचे तीन गर्भपात झाले होते. तिला जेव्हा तिच्या न जन्मलेल्या गर्भाच्या हृदयाची स्थिती खराब आहे असे सांगितले, तेव्हा ती बेशुद्ध झाली. मात्र या महिलेला गर्भधारणा कायम ठेवायची होती आणि बाळ कोणत्याही परिस्थितीत निरोगी हवं होतं. महिलेचे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाची स्थिती सांगितली. बाळाच्या हृदयाची वाढ व्यवस्थित होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर महिलेने पतील सर्व परिस्थिती सांगत विचारविनिय करून एम्ब्रॉयवर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गर्भाच्या हृदयावर उपचार करण्यास डॉक्टरांना परवानगी देण्याचे महिलेने मान्य केले.
एम्स मधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांसह इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टच्या टीमने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली ज्याला बलून डायलेशन असे म्हटले जाते. अल्ट्रासाऊंड-मार्गदर्शित प्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी गर्भाच्या हृदयात सुई घातली आणि नंतर बलून कॅथेटरचा वापर करून अडथळा असलेली झडप अथवा वॉल्व उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. ही संपूर्ण प्रक्रिया खूप लवकर करायची होती. ती खूप आव्हानात्मक होती. आम्ही ती साधारण दीड मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, असे डॉक्टरांनी सांगितले.
“या रीशेपिंगच्या प्रक्रियेमुळे, गर्भाच्या हृदयाचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा आहे. गर्भातील बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून डॉक्टरांचे अभिनंदन केले. ” एम्स येथील डॉक्टरांच्या टीमचे मी अभिनंदन करतो. डॉक्टरांनी अवघ्या 90 सेकंदांमध्ये द्राक्षाच्या आकाराचं हृदय असणाऱ्या भ्रूणावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. तसेच मांडविया यांनी आई व बाळ यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.”
I congratulate the team of doctors of @AIIMS_NewDelhi for performing successful rare procedure on grape size heart of a fetus in 90 seconds.
My prayers for the well-being of the baby and the mother. https://t.co/YIw1D5ZY1g
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) March 14, 2023