मद्यपान आणि धूम्रपानामुळे होऊ शकते का केसळगती ? टक्कल पडण्यासाठी कारणीभूत ठरते का ही सवय ?
निरोगी शरीर हवं असेल तर व्यायामासोबतच खाण्यापिण्याकडेही लक्ष देणं महत्वाचं असतं. तसचं केसांची काळजी घेतानाही काही आरोग्यदायी सवयी अवलंबण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत ज्यांना धूम्रपान आणि मद्यपान करण्याची सवय असते, त्यांना सावध राहण्यास सांगितले जाते.
नवी दिल्ली : सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत लोकांमध्ये अनेक अनारोग्यकारक सवयी आहेत, त्यात धूम्रपान आणि मद्यपान (smoking and drinking) यांचाही समावेश होतो. या दोन घातक सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे माहीत असले तरी काही लोकं ही सवय सोडण्यास तयार नसतात. त्यामुळे शरीर तर खराबव होतेच, पण केसगळती सारखी काही बाह्य लक्षणेही दिसतात. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने केस गळतात हे जाणून घेऊया.
धूम्रपान आणि मद्यपान केल्याने केस गळतात का ?
तंबाखू आणि धूम्रपानामुळे शरीराच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामध्ये हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते. सिगारेटमधील विषारी द्रव्यांमुळे टाळूमधील रक्ताभिसरण कमी होऊ शकते. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना महत्वपूर्ण पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि केस गळती देखील सुरू होऊ शकते. तसेच, धूम्रपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो, ज्यामुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात.
मद्यपान केल्याने केसांच्या आरोग्यासह आपल्या शरीराच्या इतर भागांवरही खूप हानिकारक परिणाम होतात. अल्कोहोलमुळे शरीराचे निर्जलीकरण होतो, तसेच निरोगी केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषक द्रव्येही कमी होतात. तसेच अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील हार्मोनच्या पातळीमध्ये व्यत्यय येतो, यकृत खराब होऊ शकते तसेच पोषक तत्वांच्या शोषणातही अडथळा येऊ शकतो. या सर्व गोष्टींचा केसांवर नकारात्मक परिणाम होतो.
केसगळतीची अन्य कारणे काय ?
आनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन आणि पर्यावरणातील बदल ही देखील केस गळण्याची इतर कारणे असू शकतात. तुम्हाला केसगळतीबद्दल काळजी वाटत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
केसगळतीवर उपाय काय ?
धुम्रपान आणि मद्यपानामुळे केस गळत असतील, तर शक्य तितक्या लवकर या सवयी पूर्णपणे सोडणे आवश्यक आहे. असे केल्याने एकूणच आरोग्य आणि रक्ताभिसरण सुधारू शकते. ही सवय सोडण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु निरोगी केस पुन्हा निर्माण होण्यासाठी ते आवश्यक आहे.
भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असलेल्या पौष्टिक, संतुलित आहार घेण्यावर भर द्यावा. हे अन्नपदार्थ सेवन केल्याने शरीरसाठी आवश्यक ती जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
शरीरातील हायड्रेशनची पातळी राखण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या. केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)