कोरडी त्वचा, लघवीला प्रॉब्लेम, तोंडातून दुर्गंध… अशी अनेक लक्षणे सांगतायत की तुम्ही कमी पाणी पिताय !
Symptoms Of Dehydration : उन्हाळ्यात नेहमी जाणवणारी एक समस्या म्हणजे डिहायड्रेशन. यामुळे उलट्या, लूज मोशन आणि अगदी जुलाब होतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू लागतो.
नवी दिल्ली : आपल्या जीवनासाठी पाणी (water) खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. माणूस जितके जास्त पाणी पिईल तितके त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आता कडाक्याचा उन्हाळा (hot summer) सुरू झाला असून उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा (dehydration) धोका वाढतो.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे उलट्या, लूज मोशन आणि काही वेळेस जुलाबही होऊ शकतात. पण डिहायड्रेशन होण्याआधीच आपले शरीर पाण्याच्या कमतरतेची लक्षणे दर्शवत असते, हे तुम्हाला माहीत आहे का ? शरीरात पाण्याची कमतरता असेल तर कोणती लक्षणे दिसतात, हे जाणून घेऊया.
1) त्वचा कोरडी होणे
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि ओठही सुकू शकतात. त्याची सालं निघून रक्तही बाहेर पडू लागते.
2) लघवीसंदर्भात प्रॉब्लेम
जर तुमच्या लघवीचा रंग हलका आणि पारदर्शक असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता नाही. पण जर लघवीचा रंग गडद किंवा पिवळा असेल तर शरीरात पाण्याची कमतरता आहे हे समजून घेतले पाहिजे. याशिवाय डिहायड्रेशन झाल्यास लघवीचे प्रमाण कमी होते आणि त्यात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. ही सर्व लक्षणे शरीरात पाण्याची कमतरता दर्शवतात. तुम्हालाही ही लक्षणे दिसली तर जास्त पाणी पिणे सुरु केले पाहिजे.
3) तोंडातून दुर्गंध येणे
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तोंड आणि घशात कोरडेपणा येतो, त्यामुळे श्वास घेण्याच्या त्रासासोबतच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. तुमच्याही तोंडातून सतत दुर्गंध येत असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे सुरू केले पाहिजे.
4) जास्त भूक आणि तहान लागणे
शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा डिहायड्रेशनची स्थिती असेल तर पाणी प्यायल्यानंतरही वारंवार तहान लागते. यासोबतच त्या व्यक्तीची भूकही वाढते. अशा परिस्थितीत अचानक वाढलेली भूक हेही पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे.
5) थकवा जाणवणे
तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळे खूप थकवा जाणवू शकतो. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होणे, थकवा येणे, डोकेदुखी, अस्वस्थता जाणवणे आणि जास्त झोप येणे असे त्रास होतात. अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने ही लक्षणे दूर होऊ शकतात.
6) सुस्ती जाणवणे
पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्य आणि शरीर तसेच मनावर परिणाम होतो. यामुळे तुमचा मेंदू सुस्त होतो आणि शरीरातील ऊर्जेची पातळीही कमी होऊ लागते. तुम्हालाही ही लक्षणे दिसली तर जास्त पाणी पिणे सुरू करा. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे.