नवी दिल्ली – मूळव्याध (Piles) हा एक गंभीर आजार असून यामध्ये पीडित व्यक्तीच्या मलाशयाला सूज येते व खूप वेदना सहन कराव्या लागतात. याचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे अंतर्गत मूळव्याध व दुसरा हा बाह्य मूळव्याध होय. अंतर्गत मूळव्याधात मलासोबत रक्त येते व बाह्य मूळव्याधात गुदद्वाराभोवती सूज येऊन तीव्र वेदना (pain) होते तसेच खाजही सुटते. तीव्र अतिसार किंवा बद्धकोष्ठता, धूम्रपान वा मद्यपान (smoking or drinking alcohol) करणे, शौचालयात बराच वेळ बसून राहणे, मलत्याग करताना जोर लावणे, वजन वाढणे, जड सामान उचलणे इत्यादी गोष्टी मूळव्याधासाठी कारणीभूत ठरू शकतात. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास हा त्रास दूर होऊ शकतो.
मूळव्याधाचा त्रास असताना काय खावे ?
मूळव्याधाचा त्रास सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर तो शस्त्रक्रियेविनाही बरा होऊ शकतो. मूळव्याधाच्या समस्येमध्ये फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.
1) पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे
पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर पाणी हे त्या आजाराच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे, कारण ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते. दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच मलत्याग करणेही सोपे होते. पाणी पिण्यासह तुम्ही सफरचंद, केळं, संत्र, काकडी, गाजर इत्यांदीचा ज्यूसही पिऊ शकता. हे खूप फायदेशीर ठरते.
2) संपूर्ण धान्य खावे
संपूर्ण धान्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते जे मूळव्याधात खूप फायदेशीर ठरते . मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी ओट्स, ब्रराऊन राईस व गहू इत्यादी संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा, अशी सूचना डॉक्टर देतात. संपूर्ण धान्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
3) फळांचे सेवन उपयुक्त
मूळव्याधाची लक्षणे कमी करण्यासाठी खूप फळांचे सेवन करणे हे खूप फायदेशीर ठरते . केळी, सफरचंद, द्राक्षे, संत्री यांचा आपल्या आहारात समावेश करता येईल. या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात जी मूळव्याधाचा त्रास दूर करण्यास मदत करतात.
4) हिरव्या भाज्यांचे सेवन करा
हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात ज्यामुळे मूळव्याधाची लक्षणे कमी होतात. पालक, गाजर, काकडी, कोबी आणि ब्रोकोली अशा हिरव्या भाज्या आणि पालेभाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता.
5) ताक पिण्याने मिळतो आराम
ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उत्तेजित झालेल्या नसा शांत होतात. ताक हे आपल्या शरीरातील सूज तसेच इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. ताकाचे नियमितपणे सेवन केल्यास मूळव्याधाची लक्षणे प्रभावीपणे कमी होऊ शकतात.
6) हर्बल चहा ठरतो उपयोगी
मूळव्याधाचा त्रास असेल तर हर्बल चहा पिणे हे खूप उपयुक्त ठरते. हर्बल चहाचे सेवन केल्याने सूज कमी होते तसेच मलत्याग करताना होणारा रक्तस्त्राव कमी होतो. बाजारात हर्बल टीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही हर्बल टी निवडू शकता.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)