‘या’ खाद्यपदार्थांमुळे वाढू शकतो शकतो अंडाशय आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका, अभ्यासात नवा खुलासा
रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक फूड हे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्च्या श्रेणीमध्ये येते. या प्रकारच्या अन्नामध्ये अस्वास्थ्यकर चरबी, साखर आणि मीठ यांचे प्रमाण जास्त असते. यामुळे पदार्थ तर चविष्ट बनतात पण आरोग्याला हानी पोहोचते.
नवी दिल्ली – एका नवीन अभ्यासात अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (ultra processed food) आणि कॅन्सर ( अभ्यासात ) यांच्यातील मजबूत संबंध आढळून आला आहे. क्लिनिकल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, युनायटेड किंग्डम येथील 1,97,000 हून अधिक प्रौढ नागरिकांच्या डेटाचे जवळपास 10 वर्षे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की कॅन्सरचा धोका आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमागे (death) अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचाही हात आहे. मनुष्याच्या आहारात अशा अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे प्रमाण जसजसे वाढते, तसतसा कॅन्सरचा धोकाही वाढतो.
या संशोधनाचे लेखक डॉ. एझ्टर वॅमोस यांनी सांगितले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर आपण अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आपल्या जीवनापासून दूर ठेवल्यास कॅन्सरचा धोकाही कमी होईल. अति-प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका तर वाढतोच पण त्यासह आरोग्यासंदर्भात अनेक गंभीर धोके निर्माण होतात. या पदार्थांच्या अतिसेवनाने आरोग्याला कसा धोका पोहोचतो, हे लोकांना माहीत असले पाहिजे.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे काय ? कोणते पदार्थ या श्रेणीत येतात ?
आपण नाश्त्यासाठी खातो ती सीरिअल्स, फ्रोझन पिझ्झा, रेडी टू ईट मील आणि सोडायुक्त पेय यांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. विशेषत: यामुळे अंडाशय आणि स्तनाच्या कॅन्सरचाचा धोका वाढू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चीज, सॉल्टेड पीनट बटर, पास्ता सॉस यांसारखी मध्यम प्रमाणात प्रक्रिया करण्यात आलेली अनेक उत्पादने आहेत, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे व्यसन लागू शकते. त्यामध्ये कृत्रिम चव किंवा स्वाद, रंग, स्वीटनर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. म्हणजेच या पदार्थांचा रंग, चव बदलली जाते. हॉट डॉग, डोनट्स, मॅकरोनी अँड चीज, मफिन्स, फ्लेव्हर्ड योगर्ट, अशा पदार्थांचा यात समावेश आहे.
जर एखाद्या उत्पादनाच्या लेबलवर घटकांची लांबलचक यादी असेल, तर ते अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आहे, हे समजावे. तसेच त्यामध्ये अनेक केमिकल्सची नावं असतात. उदाहरणार्थ, लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक उत्पादनांवर साखरेच्या जागी ‘राईस सिरप’ लिहिलेले असते.
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे कोणत्या कॅन्सरचा धोका वाढतो ?
या संशोधनात सहभागी झालेल्या 1,97,426 सहभागींपैकी 15,921 लोकांना कॅन्सर झाला होता आणि तर 4,009 लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. वॅमोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की एखाद्या व्यक्तीच्या आहारातील अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या प्रमाणात 10 टक्के वाढ झाल्याने सर्व कॅन्सरचा धोका 2 टक्क्यांनी वाढतो, परंतु गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका 19 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड सेवनाचा दर 10 टक्के वाढल्यास कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो आणि गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. तसेच स्तनाच्या कॅन्सरचा धोका 16% वाढतो.
मात्र असे असले तरीही अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड कॅन्सर होण्यास थेट कारणीभूत ठरतात हे या अभ्यासातून सिद्ध होत नाही. पण, यावरून हे सिद्ध होते की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने वजन वाढते आणि आरोग्यदायी पदार्थांचा वापर कमी होतो. लोक ताजी फळे आणि भाज्या कमी खातात, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. लठ्ठपणाशी संबंधित 13 प्रकारचे कॅन्सर आहेत. तसेच, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, जे गरम केल्यावर कर्करोग होतो.
कसा असावा आहार ?
– चांगले आरोग्य राखण्यासाठी, शक्य तितके ताजे, घरी शिजवलेले अन्न खाणे महत्वाचे आहे.
– आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
– रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ अन्न ठेवू नये.
– बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज्ड आणि फ्रोझन फूडपासून लांब रहावे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)