Health Tips : अंजीर खाल्ल्याने होऊ शकतो किडनी स्टोनचा त्रास ? जाणून घ्या सत्य
Figs Side Effects : अंजीर हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण त्याच्या अतिसेवनामुळे बरेच नुकसानही होऊ शकते. जास्त प्रमाणाच अंजीर खाल्ल्याने किडनी आणि मायग्रेनसंदर्भातील समस्या उद्भवू शकतात.
Side Effects of Figs : काजू, बदाम आणि किशमिश या व्यतिरिक्त अंजीराचाही (figs) हेल्दी ड्रायफ्रुट्समध्ये (healthy dryfruits) समावेश होतो. नियमितपणे अंजीर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. बऱ्याच जणांना सुका अंजीर खायला जास्त आवडते कारण त्यामुळे अंजीर जास्त फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराची इम्युन सिस्टीम मजबूत होते, त्यामुळे अनेक आजारांशी लढण्याची शक्ती शरीराला मिळते.
पण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अंजीर काही वेळा नुकसानही करू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जास्त प्रमाणात अंजीराचे सेवन केले, तर त्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त अंजीर खाल्ल्याने किडनी स्टोन, पोटदुखी आणि मायग्रेनसारखा त्रास होऊ शकतो. अंजीर खाल्ल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते, जाणून घेऊया…
दातांची समस्या
अंजीर जास्त प्रमाणात खाणे दातांसाठी हानिकारक असू शकते. एवढेच नाही तर त्यामुळे दातांना कीड देखील लागू शकते. अंजीरामध्ये (नैसर्गिकरित्या) साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे दातदुखी, दात किडणे यासारख्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच अंजीर जास्त खाऊ नयेत.
मायग्रेन
सुक्या अंजीरामध्ये सल्फाइटचे प्रमाण जास्त असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सल्फाइडयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने मायग्रेनचा ॲटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. अशा स्थितीत अंजीर जास्त प्रमाणात खाऊ नये. म्हणूनच ज्या लोकांना मायग्रेनचा जास्त त्रास होतो, त्यांनी अंजीर खाणे टाळावे.
पोटाला होऊ शकतो त्रास
पोटदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनीही जास्त अंजीर खाऊ नये. अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. अंजीराच्या अतिसेवनामुळेपोटदुखी आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.
किडनी स्टोन
ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनीही अंजीराचे अधिक सेवन करू नये. अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सलेटचे प्रमाण वाढते. यामुळे किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)