तरूणांची आवडती जीन्स उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायद्याची की धोकादायक ? काय म्हणतात डॉक्टर
अनेक फॅशन येतात आणि जातात काही फॅशन फिरुन फिरुन पुन्हा येत - जात असतात. परंतू जीन्स परिधान करण्याची फॅशन अनेक वर्षे कायम आहे. पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो की नाही..
मुंबई : पुरानी जीन्स और गिटार…असे प्रसिद्ध पॉप गाणेही जीन्सची महती सांगते. जीन्सची पॅण्ट घालणे तरूणांना खूपच आवडते. तरूणांचा तर जीन्स आणि टी शर्ट हा पेहराव कायमची ओळख झाला आहे. हल्ली विविध पॅर्टनच्या आणि़ डीझाईनच्या विविध प्रकारच्या जीन्स परीधान करण्याचे फॅडच आले आहे. परंतू सध्याच्या वाढत्या उष्म्यात जीन्स घालणे शरीरासाठी कितपत योग्य आहे ? यावर आता चर्चा झडू लागली आहे. सध्या खारघर येथे झालेल्या उष्माघातामुळे अनेक जणांच्या झालेल्या मृत्यूनंतर देशपातळीवर आपण घालतो ते कपडे कडक उन्हाळ्यासाठी योग्य आहेत का ? काय म्हणतात यावर देशातील नामवंत डॉक्टर्स पाहा..
कूल दिसणारी डेनिम शर्ट आणि जीन्स अनेक प्रकारच्या स्कीन संबंधी आजारास आमंत्रण असल्याचे म्हटले जात आहे. डेनिमचे कापड हे खरे तर हिवाळ्यासाठी योग्य आहेत. उन्हाळ्यात मात्र त्या कापडामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधीत आजार त्यामुळे उद्भवू शकतात. त्वचेला या कापडामुळे खाज, लाल चट्टे उमटणे, अलर्जी होणे, फंगल इन्फेक्शन अशाप्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते असे आरएमएल रूग्णालयाचे डॉ. कबीर सरदणा यांनी टाईम्सला सांगितले.
डेनिमचे कापड हवा बाहेर पडू देत नाही. तसेच त्वचेला आलेला घाम त्यामुळे वाळू शकत नाही. ते घाम आणि उष्णतेला ट्रॅप करतात. त्यामुळे बुरशीजन्य आजाराच्या जंतूंना वाढीस मदतच होते. तसेच जीन्स धुतल्यानंतर देखील त्यातील बुरशीजन्य जंतू सुती कापड्यांप्रमाणे सहजासहजी मरत नाहीत असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. 90 टक्के रिंगवॉर्म ( गजकर्ण ) होण्यास तुम्ही कपडे कोणते परिधाण करता यावर अवलंबून असते. जीन्स लवकर खराब होत नसल्याने ती वारंवार स्वच्छपणे धुऊन पुन्हा सुखवणे टाळले जाते यामुळे देखील स्कीन डीसीज होतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका धुण्यानंतरही बॅक्टेरीया कायम
एकवेळी धुतल्यानंतरही डेनिम जीन्समध्ये बुरशीचे जीवाणू टीकून राहू शकतात असे पबमेड जर्नलमध्ये स्पष्ट केले आहे. नायलॉन, सिंथेटीक आणि पॉलिस्टर या कपड्यांमुळे त्वचेला अॅलर्जी होऊन रॅशेस होऊ शकतात असे डॉ.रमनजीत सिंह यांनी म्हटले आहे, या कपड्यामुळे हवामोकळी होत नाही. उन्हाळ्यात सुती कपडे घालणेच योग्य आहे, या कपड्यांमुळे हवामोकळी रहाते आणि घाम सुखण्यास मदत होते असे सिंह यांनी सांगितले. उन्हाळ्यात जीन्स घातल्याने घाम सुखत नाही तसेच त्वचेवर बॅक्टेरीया वाढण्यास मदतच होते असेही त्यांनी म्हटले आहे.
जीन्स घालून रात्री झोपू नये
टाईट जीन्स आणि कपडे घालणे योग्य नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. जीन्स घालून रात्री कधीच झोपू नये. आद्रता जास्त असताना टाईट फिटींग कपडे आणि जीन्समुळे मांड्यांच्या भागात बॅक्टेरीयांची पैदास होऊन केसतुडी येण्याचे प्रमाण वाढते आणि ते खूपच त्रासदायक ठरू शकते असे त्वचाविकार तज्ज्ञ पूजा चोपडा यांनी सांगितले.