नवी दिल्ली – आजकालचे जीवन अतिशय व्यस्त झाले असून त्यामुळे आपल्या आहारात मिठाची (salt) पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. कामाचे वाढलेले तास, वेळेवर न जेवणे, यामुळे जेव्हा भूक लागते तेव्हा प्रोसेस्ड फूड किंवा जंक फूडचे (junk food) सेवन केले जाते, ज्यामध्ये मीठाचा वापर खूप केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ घातले जाते,पण अन्नपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ घातल्याने व ते सेवन केल्याने स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) (dementia) आणि अल्झायमर यासह स्मृती विकार होतात. याव्यतिरिक्त, काही संशोधनातून असे आढळले आहे की, मीठाचे जास्त सेवन केल्यास रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा यांचा धोका वाढतो, जे प्राणघातक ठरू शकते. तसेच रोज जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने ताणही वाढतो.
डिमेंशिया म्हणजे काय ?
मेयो क्लिनिकनुसार, डिमेंशिया हा काही लक्षणांचा असा संच किंवा समूह आहे, ज्याचा एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार आणि सामाजिक क्षमता यांच्यावर गंभीरपणे परिणाम होतो. ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो. अनेक आजारांमुळे डिमेंशिया किंवा स्मृतीभ्रंश होऊ शकतो. त्याची लक्षणे खालीलप्रमाणे :
– स्मरणशक्ती कमी होणे
– एखाद्या व्यक्तीशी बोलताना बऱ्याच वेळेस शब्द न आठवणे
– स्पष्ट दिसण्यात अडचण येणे
– तर्क लावणे कठीण होते.
– कठीण कामे पूर्ण करण्यात अडचण येणे
– एखाद्या गोष्टीचे प्लानिंग किंवा आयोजन करण्यास त्रास होणे
– समन्वय साधाव्या लागणारी कार्य करणे कठीण होणे.
– गोंधळ वाढण व दिशाहीनता येणे.
मीठाच्या अतिसेवनामुळे डिमेंशिया कसा होतो?
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, Interleukin-17 हा मॉलीक्यूल किंवा रेणू मेंदूच्या पेशींना नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास मदत होते, ज्यामुळे (शरीरात) रक्तप्रवाह होऊ शकतो. नायट्रिक ऑक्साईडच्या कमतरतेमुळे रक्त प्रवाह 25 टक्क्यांनी रोखला जातो, ज्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. याशिवाय जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने टाऊ (Tau) तयार होतो, जे मेंदूतील एक प्रकारचे प्रोटीन आहे आणि अल्झायमरची ओळख आहे.
मीठाचा वापर कमी कसा करावा ?
तुम्ही मीठाचा कमी प्रमाणात वापर करू शकता. किंवा पदार्थाची चव वाढवण्यासाठी (मीठाऐवजी) इतर पदार्थांचा वापर करू शकता. लसूण, काळी मिरी, व्हिनेगर, आलं अशा पदार्थांमुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर ते आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)