Smartphone side effects: फोनच्या अतीवापरामुळे डोळ्यांतून येतंय पाणी? जाणून घ्या असं का होतं
फोनच्या अधिक वापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. केवळ मोठ्या व्यक्तींनाच नव्हे तर लहान मुलांनाही हा त्रास होऊ शकतो.
नवी दिल्ली – सध्याच्या काळात लोकांचा मोबाईलचा (mobile use) वापर खूप वाढला आहे. लोकांना याची गरज असते म्हणून वापर सुरू होता पण शेवटी त्याचे व्यसन लागते. त्याच्याशिवाय जगणं कठीण होतं. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागून मोबाईलवर (excess use of mobile) वेळ घालवतात. मात्र मोबाईलच्या या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या (eye problem) उद्भवू शकतात. खरंतर मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येऊ शकते, तर कधी डोळे लाल होऊ शकतात. डोळ्यात पाणी नक्की का येते ते जाणून घेऊया.
डोळ्यातून पाणी का येते ?
1) कोरडे डोळे
आपल्या शरीरात डोळ्यांचे स्नायू सर्वात जास्त सक्रिय असतात. डोळे कोरडे होण्यापासून वाचवणे हे त्यांचे काम आहे. आपले डोळे न मिचकावता सलग काही काळ उघडेच ठेवले तर डोळ्यातून पाणी येऊ लागते. वास्तविक पाहता, जेव्हा शरीरातील पाणी, तेल आणि श्लेष्म यांचे संतुलन बिघडते तेव्हा डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो.
2) ॲलर्जी
दर वेळेस मोबाईलच्या प्रकाशामुळेच डोळ्यातून पाणी येते असे नाही. काही वेळेस हे ॲलर्जीमुळेही होऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांना खाज सुटते. त्यावर लगेच उपाय करणे महत्वाचे ठरते.
3) पापण्यांना सूज येणे
आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी, पापण्या निरोगी राहणे खूप महत्वाचे असते. पापण्यांवर कोणत्याही प्रकारची सूज आल्यास डोळ्यांना खाज सुटणे, डोळ्यातून घाण येणे आणि डोळ्यांत पाणी येणे असा त्रास होऊ शकतो.
4) संसर्ग
बॅक्टेरिआ किंवा विषाणूजन्य संसर्गामुळेही डोळे पाणावतात. त्यामुळे डोळे लाल होतात आणि त्यात पाणीही येते. हा आजार विशेषतः मुलांमध्ये खूप सामान्य आहे.
फोन वापरण्याची एक वेळ निश्चित करावी
फोनच्या अतीवापरामुळे डोळ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टर सांगतात. मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत कोणालाही डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती अंधारात स्मार्ट फोन वापरत असेल तर त्यामुळे डोळे कमकुवत होतात. ज्या लोकांची दृष्टी आधीच कमकुवत आहे, त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागून मोबाईलवर वेळ घालवतात. त्यामुळे डोळ्यांत पाणी येण्याची समस्या उद्भवते, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी फोन वापरण्याची एक वेळ निश्चित करावी. अंधारात फोन वापरू नये. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)