सतत जांभया येतात ? नका करू दुर्लक्ष, या आजारांचा असू शकतो संकेत
जांभई येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. जांभई घेताना आपण तोंड उघडतो आणि दीर्घ श्वास घेतो. जांभई अनेकदा थकवा किंवा झोपेशी संबंधित असते. जांभई येण्याची अनेक कारणे असू शकतात.
नवी दिल्ली : अनेकदा खूप थकल्यावर किंवा झोप आल्यावर आपण जांभई (yawning) देतो. जांभई येणे पूर्णपणे सामान्य आहे आणि प्रत्येक व्यक्ती दिवसातून 5 ते 19 वेळा जांभई देते. मात्र, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 10 पेक्षा जास्त वेळा जांभई देतात. काही अभ्यासानुसार, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 100 वेळा जांभई (excessive yawning) देतात. याचे एक सामान्य कारण म्हणजे ठराविक वेळेपूर्वी जागे होणे. काहीवेळा जास्त जांभई येणे हे काही गंभीर आजाराचेही लक्षण (symptoms of health problems) असू शकते. जास्त जांभई येणे किंवा वारंवार जांभई येणे हे काही औषधांचे दुष्परिणाम देखील असू शकतात. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
ही आहेत जास्त जांभई येण्याची कारणे –
जास्त वेळा जांभई येणे, हे एखादा गंभीर आजार किंवा विकृतीचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. हे एक स्लीप डिसऑर्डरचे लक्षणही असू शकते. उदाहरणार्थ, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया, यामध्ये संबंधित व्यक्तीला दिवसा जास्त झोप येते. जास्त जांभई येणे हे मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचयाशी संबंधित आजारांचेही कारण असू शकते, असेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
झोप पूर्ण न होणे – अनेकदा बऱ्याच लोकांना दिवसा खूप झोप येते, त्यामुळे त्यांना जास्त जांभई येण्याची समस्याही सहन करावी लागते. काही कारणामुळे रात्री नीट झोप पूर्ण झाली नाही, तर ही समस्या उद्भवू शकते. रात्री झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप थकवा जाणवतो आणि तुम्हाला जास्त वेळा जांभई येते.
मधुमेह – जांभई येणे हे हायपोग्लायसेमियाचे प्रारंभिक लक्षण आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्यामुळे जांभई येऊ लागते.
स्लीप ॲप्निया – स्लीप ॲप्नियाच्या रुग्णांना रात्री झोपताना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रात्री त्यांची नीट झोप होत नाही व त्यांना दुसऱ्या दिवशी खूप थकवा जाणवतो आणि वारंवार जांभई येत राहते. या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. स्लीप ॲप्नियाचा त्रास असेल तर झोपेत असताना श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो आणि सुरू होतो. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की यामध्ये झोपेतच श्वासोच्छवास थांबतो आणि संबंधित व्यक्तीला ते कळतही नाही.
नार्कोलेप्सी – नार्कोलेप्सी ही झोपेशी संबंधित समस्या आहे. ज्यामध्ये त्या व्यक्तीला कधीही आणि कुठेही अचानक झोप येऊ शकते. या आजारात रुग्णाला दिवसभरात अनेक वेळा झोप येते त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस जांभई येते.
इन्सोमेनिया – इन्सोमेनिया किंवा निद्रानाश हा देखील झोपेशी संबंधित आजार आहे. हा आजार असलेल्या व्यक्तीला रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही किंवा एकदा झोपेतून जाग आली की पुन्हा झोप लागणे कठीण होते. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने लोकांना दिवसा जास्त झोप येऊ लागते, त्यामुळे त्यांना वारंवार जांभई येते.
हृदयविकार – जास्त जांभई येण्याचे कारण व्हॅगस नर्व्ह हेही असू शकते. जे मनापासून हृदयापर्यंत आणि पोटापर्यंत जाते. काही संशोधनानुसार, जास्त जांभई येणे हे हृदयाच्या आसपास रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील दर्शवते.