पावसाळ्यात का वाढतो ‘कानातील संसर्ग’..जाणून घ्या, त्यामागची कारणे लक्षणे आणि काही उपाय!
पावसाळ्याला सुरूवात होताच, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कानदुखीच्या समस्या सूरु होतात. डॉक्टरांकडे गेल्यावर कानांत संसर्ग झाल्याचे निदान होते. मग, हा संसर्ग पावसाळ्यातच का, आणि कसा होतो. त्यामागची कारणे, लक्षणे आणि या संसर्गापासुन बचाव करण्याचे उपाय याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात कोरडी त्वचा आणि हायड्रेशनच्या समस्यांमुळे लोक त्रस्त असतात, तर पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा (infectious diseases) धोका अधीक असतो. त्यात अंतर्गत इन्फेक्शनसारख्या समस्या अधिक त्रासदायक असतात. या ऋतूमध्ये बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील आर्द्रतेमुळे असे घडते. या ऋतूमध्ये कानात बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण अधिक असते. याचे कारण म्हणजे कानात जमा होणार्या मळातील ओलावा जिवाणू किंवा बुरशी (Bacteria or fungi) वाढीसाठी सर्वोत्तम वातावरण पावसाळ्यात असते त्यामुळे, असे जिवाणू कानात हळूहळू संसर्ग वाढवतात. कानात इन्फेक्शन असेल तर दुखण्याबरोबरच मोठी समस्याही होऊ शकते. यावर उपचार न केल्यास या अवस्थेत ऐकण्याची क्षमताही नष्ट होऊ शकते. कानाच्या संसर्गापासून (From ear infections) कशा प्रकारे दूर राहता येईल, त्याची लक्षणे आणि उपाय काय आहेत याबाबत माहिती असल्यास, पावसाळ्यात या उपायांचा अवलंब करून तुम्ही स्वतःला कानाच्या संसर्गापासून वाचवू शकता.
कानाच्या संसर्गांची कारणे
1) पावसात भिजणे: अनेक वेळा लोक पावसात भिजतात. त्यामुळे केवळ कानातच नाही तर शरीराच्या इतर भागांनाही संसर्ग होऊ शकतो. कानात ओलावा झाल्यानंतर संसर्ग होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इन्फ्लुएंझा हे जीवाणू. या स्थितीत यूटेशिय ट्यूब ब्लॉक होते आणि कानात द्रव साचतो. पावसात हा द्रव आर्द्रतेत मिसळतो आणि संसर्गाला जन्म देतो. 2). साबणयुक्त पाणी: पावसाळ्यात अंघोळ करताना साबणाचे पाणी कानात गेले तर, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. बॅक्टेरिया साबणाच्या संपर्कात येऊन संक्रमण देखील करू शकतात. 3) अतिथंड पदार्थ: लोक उन्हाळ्यात आराम देणाऱ्या थंड पेय, आईस्क्रीम वगैरे पावसाळ्यातही मोठ्या आवडीने खातात. या थंड गोष्टींमुळे संसर्ग होऊ शकतो. थंड वस्तू खाल्ल्याने ग्रंथींचे नुकसान होते आणि अशा परिस्थितीत संसर्ग होण्याचा धोका असतो.
कानातील संर्संगांची लक्षणे
जर तुम्हाला कानात संसर्ग झाला असेल तर अशा स्थितीत तुमच्या कानातून द्रव बाहेर येतो. कानात दुखणे सुरु होते सोबत डोकेही दुखते. एवढेच नाही तर जर एखाद्याला निद्रानाश असेल तर त्याला या आरोग्याच्या समस्येने ग्रासले जाते. तुम्हाला कानाच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे जाणवल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सांगितलेले औषध घ्या. याशिवाय पावसाळ्यात बाहेर जाताना कानात कापूस ठेवू शकता. त्यामुळे कानात ओलावा निर्माण होणार नाही.