Menstrual Hygiene : ‘ते चार दिवस…’ त्या दिवसात हायजीनची काळजी घ्याल तर स्वस्थ रहाल, फॉलो करा सोप्या टिप्स
मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. असे न करणे महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
नवी दिल्ली : पीरियड्स अथवा मासिक पाळी (periods) ही प्रत्येक मुलगी, तरूणी व स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. प्रत्येक महिलेला आयुष्यातील काही वर्ष नियमितपणे याचा सामना करावा लागतो. काहींना या काळात खूप त्रास होतो. पण मुख्य म्हणजे मासिक पाळीच्या त्या 4-5 दिवसांत आरोग्याची व एकंदर स्वच्छतेची (cleanliness) काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. या दरम्यान महिलांनी काही निष्काळजीपणा केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या (health problems) उद्भवू शकतात. याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी मासिक पाळी स्वच्छता दिवसही साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. महिलांना मासिक पाळीशी संबंधित अचूक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
मासिक पाळीच्या कालावाधीत जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर त्यामुळे तुम्हाला खाज येणे, जळजळ होणे आणि UTI (Urinary Tract Infection) यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात ते जाणून घेऊया.
सॅनिटरी पॅड / टॅम्पॉन वेळोवळी बदलणे
पीरियड्सच्या काळात तुम्ही दर 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅड बदलत राहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही टॅम्पॉन वापरत असाल तर तेही ठराविक कालावधीने बदलत राहणे महत्वाचे आहे. ते दीर्घकाळापर्यंत वापरत राहिल्यास कीटाणू अथवा जीवाणूंचे प्रजनन केंद्र बनू शकते. यामुळे तुमचे नुकसान होऊन आरोग्याशी संबंधित त्रास सहन करावा लागू शकतो.
स्वच्छ कपडे आणि अंडरगारमेंट्स
मासिक पाळी सुरू असताना चांगले धुतलेले स्वच्छ कपडे घाला. अंतर्वस्त्रे नीट धुवा आणि उन्हात वाळवा. ओलसर अंतर्वस्त्र घालणे टाळावे. त्यात विविध प्रकारचे जीवाणू असू शकतात.
वैयक्तिक स्वच्छता राखा
पीरियड्स दरम्यान स्वतःला स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. आंघोळीसाठी आणि योनिमार्गाची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. योनिमार्गाची स्वच्छता करण्यासाठी रसायनयुक्त उत्पादने वापरणे टाळा. सॅनिटरी पॅड/टॅम्पॉन्स बदलल्यानंतर लगेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या.
ॲक्टिव्ह रहा
मासिक पाळी सुरू असताना अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी आणि हात-पाय दुखणे अशा समस्या जाणवत असतात. यादरम्यान, पीरियड ब्लोटिंगचाही सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी काही वेळ चालणे किंवा योगासने करणे आवश्यक आहे. हे तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून मुक्त होण्यास मदत करेल.
हायड्रेटेड रहावे
पीएच पातळी राखण्यासाठी, आपण वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो.