Sneezing Precaution : शिंकल्यावर या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, पसरणार नाही इन्फेक्शन
जेव्हा बाहेरचे कण नाकाता जातात, तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी आपला मेंदू मज्जातंतूंना संदेश पाठवतो, ज्यामुळे शिंक येते. शिंकताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास संसर्ग पसरणार नाही.
नवी दिल्ली : शिंका येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रिया (sneeze is natural) आहे. ती कोणालाही आणि कधीही होऊ शकते. शिंका येण्याची अनेक कारणे आहेत. ॲलर्जी (allergy) , धूळ किंवा तीव्र वास यामुळे देखील शिंक येऊ शकते. कधी सर्दीमुळेही शिंक येते. लहानपणापासून आपल्याला स्वच्छतेच्या सवयी (cleanliness) शिकवताना असे सांगितले जाते की खोकला, शिंक वगैरे आली तर नाका-तोंडावर हात अथवा रुमाल (use handkerchief) ठेवावा. असे केल्याने खोकला किंवा शिंकेवाटे विषाणू बाहेर पडून इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जाते.
खरं तर, आपल्या नाकात श्लेष्मल त्वचा असते. यामध्ये असलेल्या नसा अतिशय संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत जेव्हा कण बाहेरून आत येतात, तेव्हा मेंदू त्यांना बाहेर काढण्यासाठी मज्जातंतूंना संदेश देतो, ज्यामुळे शिंका येते. शिंकण्याद्वारे, आपले नाक स्वतः स्वतःलाच साफ करण्याची प्रक्रिया करते. हवेतील धूळ, घाण, परागकण, किंवा धूर यांसारखे बाहेरचे पदार्थ आपल्या नाकपुड्यांमध्ये गेल्यास नाकात जळजळ होऊ शकते. हे जेव्हा होते, तेव्हा नाक साफ व्हावे, यासाठी आपल्याला शिंक येते.
शिंकताना काही गोष्टींची खास काळजी घ्यावी. याने तुम्हीही सुरक्षित आहात आणि इतरांनाही संसर्ग होणार नाही, तो टाळता येईल.
तोंडावर ठेवा रुमाल
शिंक येण्याच्या काही सेकंद आधी आपल्याला ते जाणवते. म्हणूनच जेव्हा शिंक येईल तेव्हा तोंडावर रुमाल ठेवावा. त्यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये संसर्ग पसरत नाही. त्यामुळे जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हाही रुमाल अवश्य सोबत ठेवा.
साबणाने हात धुवावेत
जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे शिंक येत असेल आणि तुमच्याकडे तेव्हा रुमाल नसेल तर नाकासमोर हात धरा. मात्र असे केल्याने शिंकेद्वारे बाहेर पडलेले विषाणू तुमच्या हातात राहतात. अशा परिस्थितीत शिंकल्यावर इतर कोणत्याही वस्तूला हाताने स्पर्श करण्याआधी तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सुमारे 20 सेकंद साबणाने हात धुतल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.
हात धुण्यापूर्वी कोणत्याही वस्तूला स्पर्श करणे टाळा
शिंकताना तोंडासमोर हात धरल्यानंतर त्याच हाताने कोणत्याही गोष्टीला स्पर्श करण्याची चूक करू नका. जर तुम्ही निष्काळजीपणे एखाद्या गोष्टीला स्पर्श केला तर त्याद्वारे संसर्ग एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत शिंकल्यावर लगेच हात साबणाने स्वच्छ धुवा , मगच कोणत्याही गोष्टीला हाताने स्पर्श करू शकता.
सॅनिटायजरचा करा वापर
संसर्ग टाळण्यासाठी आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही सॅनिटायझर वापरू शकता. घराबाहेर पडल्यावर खिशात सॅनिटायझर ठेवा. शिंकल्यानंतर लगेच सॅनिटायझर वापरा, ज्यामुळे जंतू नष्ट होऊ शकतात.
एकांतात रहा
जर तुम्हाला सतत शिंकांचा त्रास होत असेल तर शिंकताना अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा जिथे लोक कमी असतील किंवा एकांत असतील. जेव्हा जास्त लोक आसपास नसतात तेव्हा संसर्गाचा धोका कमी असतो.