डाएटमध्ये फॉलो करा 50-35-15 टक्क्यांचा नियम, मिळतील असंख्य फायदे, जाणून घ्या काय आहे हा नियम ?
Dieting Tips : आहार आणि आरोग्य तज्ञांच्या ताज्या पोस्टमध्ये, डाएटिंगचा एक नवीन नियम शेअर करण्यात आला आहे. 50, 35 आणि 15 टक्के या नियमाने आहार घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले. हा नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली : लठ्ठपणाच्या समस्येशी आजकाल अनेक लोक झुंजत आहेत. वजन कमी (weight loss) करण्यासाठी नानाविध उपाय लोक करत असतात. डाएट आणि व्यायामाद्वारे वजन कमी करण्याची पद्धत आजकाल रूढ झाली आहे. लोक महागड्या आहार योजना (diet) फॉलो करतात. मात्र, डाएटिंगमुळे शरीराला हानी पोहोचवणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डाएटिंगच्या नादात शरीराशी खेळणे योग्य नाही. वजन झपाट्याने कमी व्हावे (quick weight loss) म्हणून लोक तासन्तास उपाशी राहतात. आहार आणि आरोग्य तज्ञांच्या ताज्या पोस्टमध्ये, डाएटिंगचा एक नवीन नियम शेअर करण्यात आला आहे. 50, 35 आणि 15 टक्के या नियमाने आहार घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हा नवा नियम काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
आता तुम्ही विचार करत असाल की हा नक्की कसला नियम आहे. या प्रमाणानुसार तुमच्या ताटात 50 टक्के भात, पोळी किंवा भाकरी, 35 टक्के वरण किंवा आमटी, भाज्या किंवा चिकन मटण आणि 15 टक्के लोणचे, दही, पापड, चटणी आणि कोशिंबीर असावे. या नियमाला तुम्ही बॅलेन्स्ड डाएट म्हणजेच संतुलित आहार असेही म्हणू शकता. त्याचे फायदे काय आहेत तेही जाणून घेऊया…
पचन सुधारते
ॲसिडिटी, पोटदुखी किंवा इतर समस्यांसारख्या पोटाच्या समस्या बहुतांश लोकांना असतात. चुकीचे, अयोग्य पदार्थ खाणे आणि खराब जीवनशैलीमुळे हा त्रास होऊ शकतो. मात्र वर नमूद केल्याप्रमाणे संतुलित आहार घेतला तर पचनक्रिया सुधारते. असा आहार घेतल्याने आपण पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही टाळू शकतो.
मिळेल एनर्जी
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हा आहार घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा म्हणजे या आहारामुळे आपण उर्जावान राहतो, एनर्जी कायम राहते. जेव्हा तुम्ही चुकीचे पदार्थ खाता, तेव्हा तुमचे शरीर सुस्त होते आणि तुम्हाला नेहमी झोप येते. पण वर नमूद केल्याप्रमाणे संतुलित आहार घेतल्यास तुम्हाला तंदुरुस्त आणि उत्साही वाटते. शरीरात उर्जा राहते.
चव आणि फिटनेस, दोन्हीसाठी फायदेशीर ठरते
बॅलॅन्स्ड डाएट अर्थात संतुलित आहाराची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कठोर डाएटिंगच्या नावाखाली तुम्हाला चव नसलेले अथवा बेचव अन्न खाण्याची गरज नाही. तुम्ही सर्व काही संतुलित पद्धतीने खाऊ शकता, ज्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही आणि तुम्ही चविष्ट पदार्थ खाण्याचा आनंदही घेऊ शकता.