Kidney: शरीरातील ‘या’ आजारांमुळे होऊ शकते किडनीचे नुकसान, घ्या काळजी
बऱ्याच प्रकरणांमध्ये किडनी खराब होण्याची सुरूवात ही यूटीआय इन्फेक्शनमुळे होते. सुरूवातील त्याची लक्षणे सौम्य असतात, मात्र त्यानंतर त्याचे रूप गंभीर होऊ शकते.
नवी दिल्ली – जगभरात किडनीचे आजार (kidney disease) दरवर्षी वाढत आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळे असलेली चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे हे घडत आहे. किडनीचा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट (kidney transplant)म्हणजेच किडनी प्रत्यारोपण करावे लागते. अशा परिस्थितीत किडनीच्या आजारापासून बचाव करणे हे महत्वपूर्ण ठरते. मात्र आपल्या शरीरातील इतर आजारांमुळेही किडनी खराब होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, निरोगी किडनी हवी असेल तर इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवावे लागते. कधीकधी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास (diabetes and blood pressure) असलेल्या रुग्णांमध्येही किडनीच्या समस्या वाढतात.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते आजार नियंत्रणात ठेवले पाहिजेत, हे जाणून घेऊया.
यूटीआय इन्फेक्शन
बहुतांश प्रकरणांमध्ये किडनी निकामी होण्याची सुरूवात ही UTI संसर्गापासून सुरू होते. यूटीआय म्हणजेच Urinary Tract Infection, मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे किडनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. सुरुवातीला या इन्फेक्शनची लक्षणे अतिशय सौम्य असतात, परंतु नंतर हे इन्फेक्शन किडनीच्या गंभीर आजारात रुपांतरित होऊ शकतो. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते. यूटीआय इन्फेक्शनची लक्षणे सहजपणे ओळखता येऊ शकतात. लघवी करताना त्रास होत असेल, लघवीचा रंग बदलला असेल किंवा लघवी करताना वेदना होत असतील तर ही यूटीआय इन्फेक्शनची लक्षणे असतात, अशा वेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घेतले पाहिजेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये यूटीआय इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
मधुमेह नियंत्रणात ठेवा
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मधुमेह झालेल्या रुग्णांना किडनीचा आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो. टाइप-1आणि टाईप-2 अशा दोन्ही मधुमेहाच्या रुग्णांची किडनी खराब होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे महत्वाचे असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास किडनी खराब होऊ शकते. अशावेळी तुमची औषधे नियमितपणे घेत राहणे आवश्यक आहे. रोज थोडावेळ तरी व्यायाम करावा आणि पथ्य सांभाळावे. साखरेची पातळी वाढल्यास योग्य डाएट घ्यावे.
ब्लड प्रेशरवर ठेवा नियंत्रण
जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यालाही किडनीच्या आजाराचा धोका असतो. अशा परिस्थितीत आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आत्मसात कराव्यात. नियमितपणे ब्लड प्रेशर तपासत रहावे. बीपी वाढल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ते उपचार करावेत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)