मुंबई : सध्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बदलती जीवनशैली, बदलते वातावरण, ताण-तणाव अशा अनेक कारणांमुळे लोकांना हृदयविकाराचे झटके येताना दिसतात. त्यात आजकाल या आजाराने लोकांना इतके ग्रासले आहे की फक्त वृद्धांनाच नाही तर आजकालच्या तरुणांना देखील हृदयविकाराचे झटके येताना दिसत आहेत. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल ही हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सीपीआर देणे हे एक तंत्र आहे, जे रुग्णाला शुद्धीवर आणण्यास मदत करते. पण सीपीआर म्हणजे नेमकं काय? हे बहुतेक लोकांना माहीत नसतं. तर आता आपण सीपीआर म्हणजे काय? आणि ते कसे दिले जाते? तसेच ते दिल्यानंतर काय केले पाहिजे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सीपीआर म्हणजे कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर द्या. सीपीआर दिल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा बऱ्यापैकी जीव वाचू शकतो. सीपीआर दिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू होण्यास मदत होते. त्यामुळे हा एक प्रकारचा प्रथमोपचार मानला जातो. त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्याला सीपीआर देऊन त्याचा जीव आपण वाचवू शकतो.
एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा सर्वात प्रथम त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवा. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकत्र जोडून ते त्या व्यक्तीच्या छातीवर जोरात दाबा. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीची छाती जोरात दाबल्यामुळे त्याच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला सीपीआर देणं खूप गरजेचं असतं.
सीपीआर दिल्यानंतर हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात करू शकते. जेव्हा ती व्यक्ती शुद्धीवर येते तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात दाखल करा जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होईल.