Health : वयाची 20 आणि 30 वर्षे पुर्ण झाल्यावर जरूर कराव्यात ‘या’ मेडिकल चाचण्या, नाहीतर…
20, 30 आणि 40 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वैद्यकीय चाचण्या वेगवेगळ्या असू शकतात. पण त्या करून घेतल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घेण्यास मदत होते.
Health News : सध्या संपूर्ण जगभरात कोरानाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसंच आजकालचं वाढतं प्रदूषण, बदलते हवामान, वाढतं तापमान यामुळे नागरिकांना अनेक वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने हेल्थ चेकअप करून घेणं गरजेचं आहे.
आरोग्य तज्ञ सांगतात की, आपल्या निरोगी आरोग्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी किंवा चाचण्या करणे आवश्यक आहे. तसंच 20, 30 आणि 40 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वैद्यकीय चाचण्या वेगवेगळ्या असू शकतात. पण त्या करून घेतल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घेण्यास मदत होते. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या करून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांबद्दल सांगणार आहोत.
वयाच्या 20 व्या वर्षी महत्वाची टेस्ट
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे 20 वयोगटातील आहेत त्यांनी कोलेस्टेरॉल तपासणी केली पाहिजे. तसेच नियमित रक्त तपासणी आणि रक्तदाब तपासणी केली पाहिजे जेणेकरून भविष्यातील समस्या टाळू शकतात. एवढेच नाही तर या वयोगटातील मुलं आणि मुलींनी संपूर्ण ब्लड काउंटचीही चाचणी करणे आवश्यक आहे. सोबतच या वयातील मुलींनी, त्याची हिमोग्लोबिन चाचणी करणे आवश्यक आहे.
वयाच्या 30 व्या वर्षी या टेस्ट करून घ्या
30 वर्षे वयोगटातील स्त्री-पुरुषांनी शुगर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तसेच महिलांनी त्यांच्या स्तनाची अल्ट्रासाऊंड टेस्ट करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 40 वर्षांपर्यंत महिलांनी स्तनाचा कर्करोगबाबत सावधगिरी म्हणून दर तीन वर्षांनी ही चाचणी करावी.
40 वयोगटातील लोकांनी या टेस्ट करण्याकडे दुर्लक्ष करू नये
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, वयाच्या 40 व्या वर्षी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. या वयातील लोकांना मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्याच्या चाचण्या करून घ्याव्यात. तसंच छातीचा एक्स रे आणि ईसीजी टेस्ट या वयोगटातील लोकांसाठी आवश्यक आहेत.