Health: जखम भरायला लागत असेल अधिक वेळ, तर फक्त मधुमेहाचा नाही ‘हे’ देखील असू शकते कारण
मधुमेह असलेल्या व्यक्तीला जखमा भरायला वेळ लागतो, मात्र जखम भरायला वेळ लागण्यामागे मधुमेह हे एकमेव कारण नाही. का ते जाणून घ्या
मुंबई, शरीराचे कार्य योग्य रित्या चालू ठेवण्यासाठी, नियमितपणे अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. आहाराद्वारे ही पोषक तत्वे शरीराला मिळत असतात. काही परिस्थितींमध्ये त्याची कमतरता भासत असली तरी त्याची खरी कारणे वेळीच जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जखम भरण्याची स्थिती समजून घेऊ. जखम भरण्यास उशीर होण्यामागे (Wounds take time to heal) मधुमेह हा एक प्रमुख घटक मानला जातो. इतरांपेक्षा जास्त रक्त शर्करा असलेल्या लोकांमध्ये जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. पण प्रत्येक वेळी मधुमेह हेच याचे कारण असावे, असे आवश्यक नाही.
तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की जखमा बऱ्या होण्यास उशीर होणे किंवा जखमा बऱ्या न होणे, मधुमेहाव्यतिरिक्त, काही प्रकारच्या पोषणाची कमतरता हे देखील कारण मानले जाऊ शकते. संशोधकांना असे आढळून आले की प्रथिनांची कमतरता असलेल्या लोकांमध्ये जखमा भरून निघायला वेळ लागतो. संशोधकांच्या मते, बहुतेक प्रौढांना दररोज 55-60 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. चला जाणून घेऊया प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात इतर कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
जखम बरी होण्यासाठी वेळ लागणे
प्रथिनांच्या कमतरतेच्या या लक्षणाबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ दिसून येतो. संशोधकांना असे आढळून आले की प्रथिनांची कमतरता असलेल्या लोकांच्या जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागू शकतो. शरीर पुरेसे कोलेजन तयार करत नसल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, जे संयोजी ऊतकांमध्ये तसेच तुमच्या त्वचेमध्ये आढळते. रक्ताची गुठळी तयार करण्यासाठी आपल्याला प्रथिने आवश्यक आहेत. अशा लक्षणांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
त्वचेवर दिसून येतात परिणाम
प्रथिनांच्या कमतरतेमध्ये स्नायूंच्या विकासासोबतच त्याचे दुष्परिणाम केस आणि त्वचेवरही दिसून येतात. आपल्या केसांना, त्वचेला आणि नखांना इलास्टिन, कोलेजन आणि केराटिन सारख्या प्रथिनांची आवश्यकता असते, त्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस ठिसूळ किंवा पातळ होऊ शकतात. प्रथिनांची कमतरता असलेल्या लोकांमध्ये त्वचेच्या कोरडेपणाची समस्या देखील दिसून येते. प्रथिनांच्या कमतरतेच्या बाबतीत, तुमच्या नखांवर देखील गडद रेषा दिसतात.