उन्हाळ्यात दररोज काकडीचा रायता खाल्ल्यास काय होईल? तज्ञांकडून जाणून घ्या
उन्हाळ्यात काकडीचा रायता केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवतो. हे पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी ठेवते. म्हणूनच, जर तुम्हाला या उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल, तर दररोज तुमच्या आहारात काकडीचा रायता समाविष्ट करा.

सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे. कारण उन्हाळ्यात थंड आणि हलके पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. या दिवसांमध्ये शरीराचे तापमान वाढल्याने डिहायड्रेशन, अॅसिडिटी आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत काकडीचा रायता हा एक उत्तम पर्याय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही तर आपली पचनक्रिया देखील सुधारतो. तुम्हाला जर उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त राहयचे असेल तर तुमच्या आहारात काकडीच्या रायत्याचे समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता सांगतात की, काकडीत 90 % टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि काकडीच्या सेवनाने तुमची त्वचाही चमकू लागते. जर तुम्हाला उन्हाळ्यात काहीतरी हलके पण पौष्टिक खायचे असेल तर काकडीचा रायता तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करावा. काकडीचा रायता बनवताना आपण त्यात दही मिक्स करतो. त्यामुळे दह्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अशातच आपण जाणून घेऊया काकडीचा रायता खाण्याचे फायदे कोणते आहेत.
काकडीचा रायता खाण्याचे फायदे




शरीराला थंडावा देते
उन्हाळ्यात बाहेरच्या तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात काकडीचा समावेश करा. कारण काकडीत सुमारे 90% पाणी असते, जे शरीराला आतून थंड ठेवते. तुम्ही उन्हात बाहेर गेलात तर काकडीचा रायता खाल्ल्याने उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळता येते.
पोटासाठी फायदेशीर
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लता यासारख्या पोटाशी संबंधित समस्या अधिक सतावत असतात.यापासून सुटका मिळावी यासाठी आहारात काकडीच्या रायत्याचे सेवन करा. काकडीचा रायता पोट थंड ठेवतो आणि पचन सुधारतो. तसेच यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्न सहज पचते आणि पोट हलके राहते.
वजन नियंत्रित करण्यास मदत
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर काकडीचा रायता तुमच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यातच काकडीच्या रायत्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. यामुळे वारंवार अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची सवय देखील नियंत्रित राहते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात अनेकांची त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळेस तुम्ही जेव्हा काकडीचे सेवन करता तेव्हा तुम्हाला या समस्यापासुन सुटका मिळते. कारण काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी भरपूर असते, जे त्वचेला हायड्रेट करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते. याशिवाय, काकडीचा रायता शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या कमी होते.
निरोगी काकडीचा रायता कसा बनवायचा?
काकडीचा रायता बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात बारीक चिरलेली काकडी मिक्स करा. या मिश्रणात वरून थोडे मीठ, भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी आणि पुदिना घाला आणि चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे कोथिंबीर देखील मिक्स करू शकता. तर हे तयार झालेला काकडीचा रायता चविष्ट असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप चांगले आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)