Health : फिरायला गेल्यावर या गोष्टींची काळजी घ्या, टायफॉइड डेंग्यू आसपासही नाही फिरकणार!
पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.
मुंबई : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकजण फिरायला ट्रेकचे प्लॅन करतात. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण पावसात फिरायला गेल्यानंतर भिजण्यासोबतआरोग्याची काळजी घेणेही तितकंच गरजेचं असतं. कारण पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड असे अनेक आजार होतात. पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.
फास्ट फूड खाणे टाळा
पावसात बाहेर फिरायला गेल्यानंतर आपण फास्टफूडवर ताव मारतोच. मग गरमागरम भजी असो किंवा वडापाव असो असे पदार्थ आपण आवर्जून खातोच. पावसाळ्यात हे पदार्थ खायलाही छान वाटतं पण पण ते तितकेच आपल्या आरोग्यास हानिकारकही असतात. रस्त्यावर खाल्लेल्या या पदार्थांमुळे आपल्याला जीवाणूजन्य आजार होऊ शकतात, त्यामुळे असे पदार्थ खाणे जास्तीत जास्त टाळावे.
स्वच्छ पाणी
पावसाळ्यात आपण बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर तिथे स्वच्छ पाणी मिळणे जरा कठीणच असते. त्यामुळे जेव्हाही पावसाळ्यात तुम्ही फिरायला जाल त्यावेळी घरून स्वच्छ पाणी असलेली बाटली भरून स्वतःजवळ ठेवावी. तसेच पावसाळ्यात जास्तीत जास्त उकळलेले पाणी प्यावे जेणेकरून आपल्याला सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.
पुरेशी झोप
प्रत्येकाने दररोज पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. जर पुरेशी झोप घेतली नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक असतं. कारण अपूर्ण झोप घेतली तर आपल्याला पचनाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे पावसाळ्यात पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं.