उन्हाचा तडाखा लय बेक्कार ! उष्माघातापासून वाचायचे असेल तर करा हे उपाय
भारतात सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत असून लोकांना घाम फुटला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक लोकांना उष्माघाताचा त्रासही होत आहे. अशा वेळी बचावासाठी काय उपाय करावेत ते जाणून घेऊया.
मुंबई : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उष्णतेच्या लाटेचा (heatwave) कहर दिसू लागला आहे. शाळांच्या वेळाही बदलत आहेत. या बदलत्या ऋतूमध्ये कडक उष्णतेपासून बचाव करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. दरम्यान खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी 11 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाले आहेत. उन्हाळ्याच्या या वाढत्या तडाख्यात तग धरण्यासाठी व उन्हामुळे होणारी काहिली (heatstroke) कमी करण्यासाठी विशेष काळजी (tips to stay cool) घेणेही महत्वाचे आहे. या हंगामात निरोगी राहण्यासाठी उष्णतेला कसे हरवायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तापमानात सातत्याने वाढ होत असून त्यात तात्काळ आराम मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आगामी काळात वाढत्या तापमानासोबतच उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा? शरीराचे तापमान कसे नियंत्रित करावे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
उष्ण हवामानात तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला उच्च तापमानामुळे अस्वस्थ आणि बेचैन वाटत असल्यास, तो उष्माघात असू शकतो. उष्ण हवामानाचा सामना करण्यासाठी काही टिप्स –
– उन्हापासून शक्य तितके दूर रहा, तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
– विशेषत: सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान बाहेर जाणे आवश्यक असल्यास, सनस्क्रीन, डोक्यावर टोपी आणि टॉवेलसारखे हलके कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
– शरीराचे तापमान वाढेल, किंवा शरीर तापेल असा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करणे टाळावे.
– शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड अन्न आणि पेये घ्या.
– अल्कोहोल, कॅफिन आणि गरम पेय पिणे टाळा.
– थंड पाण्याने आंघोळ करा. तापमान गरम असताना, पाणी भरून थोडावेळ ठेवता येते. त्यानंतर अंघोळ करा.
– चेहरा, हात-पाय गार पाण्याने धुवत रहा. तुम्ही जिथे बसाल ती जागा गार ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसा खिडक्या बंद ठेवा. रात्री जेव्हा बाहेरचे तापमान कमी होईल, तेव्हाच खिडक्या उघडा.
जर तापमान 35 अंशांपेक्षा कमी असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक फॅनची मदत घेऊ शकता. खोल्यांचे तापमान तपासा, विशेषत: जेथे उच्च धोका असेल तिथ राहणाऱ्या व झोपणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी.
उष्णतेची लाट म्हणजे काय, तर आपले मानवी शरीर जे सहन करू शकत नाही त्यापेक्षा जास्त उष्ण हवामान असणे. उन्हाळ्याच्या हंगामात वाहणारे उष्ण वारे म्हणजे उष्माघात खूप धोकादायक असतो. अशा वेळी स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची तयारी कशी करावी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित होण्याची प्रमुख कारणे – पुरेसे पाणी न पिणे (Dehydration). ज्या लोकांना हृदय किंवा श्वासोच्छवासाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी अधिक सतर्क राहण्याची हीच वेळ आहे. उष्णतेमुळे थकवा आल्यास उष्माघात आणखी घातक ठरू शकतो.
सर्वात जास्त धोका कोणाला ?
– उष्माघात कोणालाही प्रभावित करू शकतो, परंतु वृद्ध लोकांना सर्वाधिक त्रास होऊ शकतो.
– उष्माघात विशेषत: 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि स्त्रियांना प्रभावित करतो.
– केअर होमसारख्या ठिकाणी एकटे राहणारे लोक देखील असुरक्षित आहेत.
– ज्या लोकांना हृदय किंवा फुफ्फुसाचा आजार आहे. अशांनाही उष्माघातामुळे त्रास होऊ शकतो.
– मधुमेह, किडनीचे आजार, पार्किन्सन्स रोग किंवा काही मानसिक आरोग्य समस्या ज्या दीर्घकाळापासून आहेत.
– जे लोक नियमितपणे अनेक औषधे घेतात. ते उष्ण हवामानामुळे वाईटरित्या प्रभावित होऊ शकतात.
– अगदी लहान मुलं तसेच शाळेत शिकणारी मुले.
– अंमली पदार्थ किंवा अल्कोहोलचे व्यसन किंवा अल्झायमर रोग असलेले लोक जे घराबाहेर किंवा गरम ठिकाणी बराच वेळ घालवतात.
– अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहणारे लोक.
– बेघर लोक किंवा घराबाहेर काम करणारे लोक.