High Cholesterol : सावधान ! हाय कोलेस्ट्रॉलमुळे गमवावी लागू शकते दृष्टी, या लक्षणांकडे वेळीच द्या लक्ष
फॅटयुक्त आहार, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे एखाद्या व्यक्तीला हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानल्या जातात. हाय कोलेस्ट्रॉलमुळे डोळ्यांवरही वाईट परिणाम होऊ शकतो.
नवी दिल्ली – आजकालचे मानवी जीवन अतिशय धकाधकीचे आणि धावपळीचे (busy lifestyle) झाले आहे. या जीवनात आपल्याला अनेक समस्या वारंवार त्रास देतात, त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची (cholesterol) वाढलेली पातळी. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते, चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉल खूप वाईट मानले जाते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, काही वेळेस रक्तप्रवाह थांबतोही, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (heart disease)येण्याचा तसेच आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीय रित्या वाढतो.
शरीरात नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल असणे धोकादायक मानले जात नाही, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण खूप जास्त वाढते, तेव्हा अनेक रोगांचा धोका वाढतो. साखर आणि सॅच्युरेटेड फॅटने भरलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते.
शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात तर होतोच पण त्यामुळे डोळ्यांवरही खूप वाईट परिणाम होतो. जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा डोळ्याभोवती काही बदल दिसतात. त्यामुळे डोळ्यांचा रंग आणि बघण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमचे डोळे नेहमी निरोगी राहावेत असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठीकोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
हाय कोलेस्ट्रॉलचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो ?
जँथिलास्मा (Xanthelasmata)- जँथिलास्मा हे हाय कोलेस्ट्रॉलचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते, ज्यामुळे डोळे आणि नाकाच्या आजूबाजूची त्वचा पिवळी पडू लागते. याचा तुमच्या दृष्टीवर परिणाम होत नाही. जे लोक धूम्रपान करतात किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाची समस्या आहेत त्यांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. या समस्येला डोळ्यांवर कोलेस्ट्रॉल जमा होणे असेही म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात दिसू शकते. डोळ्याभोवती कोलेस्टेरॉलचे अनेक दाणे दिसतात.
आर्कस सेनिलिस (Arcus Senilis)- आर्कस सेनिलिस किंवा कॉर्नियल आर्कस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती निळ्या किंवा राखाडी रंगाचा गोलसर आकार दिसू लागतो. हे कॉर्नियामध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे होते आणि मुख्यतः मध्यमवयीन लोकांमध्ये आढळते. डोळ्यांभोवती जमा झालेले कोलेस्ट्रॉल शस्त्रक्रियेने काढून टाकता येते व त्यावर उपचार करता येतात.
रेटिनल व्हेन ऑक्लूजन (Retinal Vein Occlusion)- रेटिनल व्हेन ऑक्लूजन हा एक आजार आहे जो थेट हाय कोलेस्ट्रॉलशी संबंधित आहे. हा त्रास सहसा, काचबिंदू, मधुमेह, रक्तवहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि रक्त विकारांसह होतो. या आजारामुळे रेटिनामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या रक्तपेशी ब्लॉक होतात. रेटिना ही तुमच्या डोळ्याच्या मागील बाजूस असलेली एक हलका, संवेदनशील टिश्यू असतो, ज्याला रेटिनल धमनी आणि रेटिना नसांच्या माध्यमातून रक्त मिळते.