अवयवदानात हिंदू आणि मुस्लीम एकता, त्या महिलांनी किडनी दान करून एकमेकांचे वाचविले कुंकू
किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी त्या दोघांच्या कुटुंबातील कोणत्याही किडनी दात्यांशी कोणतेही पॅरामीटर जुळत नव्हते. दोन्ही घरातील कुटुंब प्रमुखांना डायलीसीसचा सहारा उराला होता. त्यानंतर किडनी अदलाबदल करण्याचा निर्णय झाला.
नवी दिल्ली : अवयवदान हे रक्तदानासारखे पवित्र दान असले तरी अवयदानासाठी फार मोठे मन असावे लागते. स्वत:चा शरीराचा अवयव दुसऱ्याला दान करताना फार मोठे धारिष्ट्य लागते. आपल्या रक्ताच्या नात्याला वाचविण्यासाठी आतापर्यंत अवयव दान झाले आहे. परंतू राजधानी दिल्लीच्या एका रूग्णालयात किडनी स्वॅपची ( अदला-बदल ) दुर्मिळ घटना घडली आहे. उत्तर प्रदेश आणि जम्मू-कश्मीर मधील दोन कुटुंबामध्ये ना रक्ताचे नाते, ना जुनी मैत्री, एक मुस्लीम तर एक हिंदु कुटुंब तरी त्यांच्यात जगावेगळ्या किडनी दानाने एक वेगळे नाते जुळले गेले आहे.
नवी दिल्लीच्या ओखला येथील फोर्टीस एस्कॉर्टस रुग्णालयात हे जगावेगळे अनोखे अवयवदान घडले आहे. 62 वर्षीय मोहम्मद सुल्तान डार हे कश्मीरच्या टेलिफोन विभाग काम करतात. तर उत्तर प्रदेशातील बरेलीत राहणारे 58 वर्षीय माजी सैनिक विजय कुमार या दोघांना आजारपणामुळे किडनी बदल्याची वेळ आली होती. परंतू किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी त्या दोघांच्या कुटुंबातील कोणत्याही किडनी दात्यांशी कोणतेही पॅरामीटर जुळत नव्हते. दोन्ही घरातील कुटुंब प्रमुखांना डायलिसीसचा सहारा उराला होता. किती वर्षे डायलिससवर रहाणार. किडनी दानातूनच त्यांना जीवदान मिळणार असल्याने किडनी दाते शोधण्यात वेळ जात होता. दोन्ही कुटुंबिय चिंतेत सापडले होत. दोन्ही पुरूषांना 18 महिन्यांपासून डायलिसिसवर ठेवण्यात आले होते.
किडनी स्वॅप ट्रान्सप्लांट
मुत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मुख्य संचालक डॉ. संजीव गुलाटी यांनी सांगितले की दोन्ही प्रकरणात डोनर आणि रूग्ण यांचे ब्लड ग्रुप मिस मॅच होत होते. त्यामुळे एकच पर्याय शिल्लक राहीला. तो म्हणजे अदला-बदलीचा ! भारतात हा प्रकार खूपच दुर्मिळ आहे. किडनीची अदलाबदली करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर दोन्ही रूग्णांना फोर्टीस मध्ये आणले. सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या. प्री- ट्रान्सप्लांट कम्पॅटीबिलिटी चेक, हयुमन ल्युकोसाईट एंटीजन टायपिंग आणि जेनेटिक टेस्ट अशा ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या.
एकमेकांच्या पतीला वाचविले
16 मार्च रोजी सहा डॉक्टरांच्या टीमने या चार शस्रक्रिया केल्या, त्यासाठी सहा तास लागले. डॉ.गुलाटी यांच्या टीममध्ये डॉ. अजित सिंह नरुला, डॉ.अनिल गुलीया आणि डॉ.परेश जैन ( युरोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट ) आणि दोन ज्युनियर डॉक्टर सामील होते. रुग्ण आणि डोनरला 27 मार्चला डिस्चार्ज दिला आहे त्यांची प्रकृती उत्तम आहे. जर वेळवर ट्रान्सप्लांट झाले नसते तर ते पाच वर्षांपर्यंतच जीवंत राहू शकले असते. धर्म आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा विचार न करता या महिलांनी एकमेकांच्या पतीला वाचविण्यासाठी पुढाकार घेत आपली एक किडनी दान केली आहे.