सावधान! सेक्समधून पसरतोय ‘मंकीपॉक्स’; तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी?
मंकीपॉक्स विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी अमेरिकेतही त्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. अलीकडे, तज्ज्ञांनी मंकीपॉक्स विषाणूबद्दल एक धोक्याचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत जगभरातील लोक कोरोनाच्या साथीतून सावरू शकलेले नाहीत, अशा परिस्थितीत एका नवीन विषाणूने लोकांची चिंता वाढवली आहे. इंग्लंडशिवाय मंकीपॉक्स (Monkeypox) नावाचा हा विषाणू स्पेन, पोर्तुगालसारख्या अनेक देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत हा विषाणू श्वसनमार्गातून, जखमेतून, नाक, तोंड आणि डोळ्यांमधून पसरतो, असा तज्ज्ञांचा समज होता, परंतु अलीकडच्या नवीन केसेसनंतर हा विषाणू लैंगिक संबंधातूनही (Even through sex) पसरू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की जेव्हा तुम्ही मंकीपॉक्स विषाणूने संक्रमित व्यक्तीसोबत सेक्स करता तेव्हा तुमच्या शरीरात हा विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असते. शास्त्रज्ञांनी नुकतेच जाहिर केले आहे की, इटलीमधील काही रुग्णांच्या सीमेनमध्ये (semen) मंकीपॉक्स विषाणूचे जंतु आढळले असून, त्यामुळे स्पष्ट होते की, हा रोग लैंगिकरित्या देखील संक्रमित होऊ शकतो.
संशोधनात काय आढळले?
मंकीपॉक्स विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो असे मानले जाते, हा विषाणू त्वचा, जखमा आणि श्वासाद्वारे पसरतो. मात्र आता नव्याने केलेल्या अध्यायनातून असे देखील आढळून आले आहे की, मंकीपॉक्सचा विषाणू हा सेक्सद्वारे देखील पसरतो. मंकीपॉक्स प्रमाणेच एचआयव्ही हा देखील एक आजार लैंगिकसंबंधातून पसरतो. रोम स्थित एका रुग्णालयातील आणि स्पालान्झानी संस्थेच्या संशोधकांना चार रुग्णांच्या सीमेनमध्ये मंकीपॉक्सचे विषाणू आढळून आले आहेत
मंकीपॉक्स विषाणूची लक्षणे
जेव्हा तुम्हाला मंकीपॉक्स विषाणूची लागण होते, तेव्हा त्याची पहिली लक्षणे 5 ते 21 दिवसांत दिसू लागतात. या दरम्यान तुम्हाला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थरथर, थकवा, पाठदुखी अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पिंपल्ससारखे फोड दिसायला लागतात. हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसू लागतात. हे मुरुम जखमासारखे दिसतात आणि स्वतःच सुकतात आणि पडतात.
मंकीपॉक्सने मृत्यू होऊ शकतो का?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, मध्य आफ्रिकेतही जिथे लोकांना मूलभूत आरोग्य सुविधाही उपलब्ध नाहीत, या विषाणूची लागण झालेल्या 10 लोकांपैकी केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. मंकीपॉक्सच्या अनेक प्रकरणांमध्ये, रुग्ण काही आठवड्यांत बरा होतो.
यावर काही उपचार आहे का?
मंकीपॉक्स विषाणूवर अद्याप कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. अशा परिस्थितीत, हा विषाणू पसरू नये म्हणून या विषाणूची लागण झालेल्या लोकांनी स्वतःला इतर लोकांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
मंकीपॉक्स विषाणू कसा पसरतो?
संक्रमित प्राण्याला जखमी झाल्यास त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या संपर्कात आल्याने किंवा त्याचे रक्त, पंख इत्यादींना स्पर्श केल्याने देखील तुम्हाला मंकीपॉक्स विषाणूची लागण होऊ शकते. याशिवाय हा विषाणू उंदीर, वटवाघुळ यांच्याकडूनही पसरू शकतो. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये, आपण कमी शिजवलेले मांस किंवा संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्याने देखील या विषाणूला बळी पडू शकता. जरी हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरत नाही, परंतु जर तुम्ही संक्रमित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, अंतर्वस्र यांसारख्या वस्तू वापरत असाल किंवा बाधित व्यक्ती खोकली, शिंकली तर तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो असा दावा आजतक या वृत्तवाहिनीकडून करण्यात आला आहे.