झूटां खाने से प्यार बढता है… कसलं काय ! मित्राच्या उष्ट्या नूडल्स खाणं पडलं भलतंच महागात, विद्यार्थ्याला थेट ऑपरेशन टेबलवरच नेलं
डॉक्टरांनी सांगितले की, विद्यार्थ्याला जी गंभीर लक्षणे होती ती पाहता असे दिसते की, आक्रमक बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे त्याला हा गंभीर त्रास झाला.
नवी दिल्ली : एक तीळ सात जणांत वाटून खावा, अशी आपली शिकवण. त्यानुसार आपण कोणताही पदार्थ खाताना एकमेकांना विचारून खातो किंवा शेअर (food sharing) करून खातो. कधीतरी तर आपल्याच ताटातील घास समोरच्याला भरवतोही. हे जरी प्रेमाचे प्रतीक मानत असलो तरी कधीकधी असं करण्याचा उलट परिणामही होऊ शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ब्रिटनमध्ये एका विद्यार्थ्याला उष्टा पदार्थ खाल्ल्यामुळे अतिशय धोकादायक ऑपरेशनला (operation) सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे हा उष्टा पदार्थ खाण्याच्या एक दिवस आधीपर्यंत त्याची तब्येत पूर्णपणे ठीक होती. त्याला कोणतीही शारीरिक समस्याही जाणवली नव्हती. खरंतर त्या विद्यार्थ्याने त्याच्या रूममेटचे उरलेले चिकन नूडल्स (noodles)खाल्ले होते, जे जवळच्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केले होते.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, उष्ट्या नूडल्स खाल्ल्यानंतर त्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडू लागली आणि तो गंभीर आजारी पडला. विद्यार्थ्याच्या शरीराचे तापमान कमालीचे वाढले आणि पल्स प्रति मिनिट 166 बीट्स झाले. त्याची परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, डॉक्टरांना त्याला तात्काळ बेशुद्ध करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की त्याला कोणतीही ॲलर्जी नाही आणि तो जास्त मद्यपान करणाराही नव्हता.
डॉक्टरांनी काय सांगितले ?
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा विद्यार्थ्याला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याला तात्काळ अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. कारण त्याची नाडी मंद होत होती. दरम्यान रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 20 तासांपर्यंत विद्यार्थी बरा होता. पण जेव्हा त्याने त्याच्या रूममेटचा उरलेला भात, चिकन नूडल्स इत्यादी पदार्थ खाल्ले तेव्हा त्याचे पोट दुखू लागले आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या पाच तास आधी त्याची त्वचा जांभळी पडू लागली होती. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्याच्या अन्नात आढळलेला बॅक्टेरिया हा लाळेद्वारे पसरतो.
विद्यार्थ्याला जी गंभीर लक्षणे होती ती पाहता, असे दिसते की ते आक्रमक बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे त्याला त्रास झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. त्या विद्यार्थ्याची किडनी निकामी झाली होती आणि रक्तही गोठण्यास सुरुवात झाली होती. रिपोर्टनुसार, रक्त तपासणीचा निकाल आल्यानंतर डॉक्टरांना विद्यार्थ्याच्या रक्तात ‘नायसिरिया मेनिनजिटिडीस’ (Neisseria Meningitidis) नावाचा जीवाणू असल्याचे आढळून आले.
नायसिरिया मेनिनजिटिडीस म्हणजे काय ?
डॉक्टरांनी सांगितले की, 10 पैकी एका व्यक्तीच्या नाकात आणि घशाच्या मागच्या भागात नायसिरिया मेनिनजिटिडीस (Neisseria Meningitidis)जीवाणू असतात. त्यांना वाहक असे म्हटले जाते. हे जीवाणू काहीवेळा शरीरावर हल्ला करतात आणि काही आजारांना कारणीभूत ठरतात, ज्याला मेनिनजकॉकल रोग (meningococcal)म्हणून ओळखले जाते. नायसिरिया मेनिनजिटिडीस या जीवाणूंचे 6 प्रकार आहेत – A, B, C, W, X आणि Y. या सर्वांमुळे जगभरातील बहुतेक रोग होतात. यापैकी, तीन सेरोग्रुप्स म्हणजे B, C आणि Y हे अमेरिकेत दिसणार्या बहुतेक रोगांसाठी कारणीभूत आहेत.
रक्तामध्ये असलेले हे बॅक्टेरिया संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या या पसरवतात अथवा लांबवतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि ऑक्सिजन शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंध होतो. या संपूर्ण परिणामाला ‘पुरपुरा फुलमिनन्स’ (Purpura Fulminans) असे म्हणतात. डॉक्टरांनी सांगितले की, विद्यार्थ्याचा रक्तदाब स्थिर झाल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाच्या बोटांना गँगरीन झाल्याने, त्याची 10 बोटे आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापण्यात आले.