Diet For Anemia: शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होऊ शकतो ॲनिमिया, असे वाढवा हिमोग्लोबिन
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच पौष्टिक अन्न न खाल्यामुळे बऱ्याच वेळेस शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते, जे ॲनिमियासाठी कारणीभूत ठरू शकते.
नवी दिल्ली – खाण्यापिण्याकडे नीट लक्ष न देणे आणि खराब जीवनशैली (bad lifestyle) हे आजकाल आरोग्याच्या अनेक समस्यांचे कारण बनले आहे. ब्लड प्रेशर, मधुमेह यांसारखे अनेक गंभीर आजार आजकाल लोकांना सतत भेडसावत आहेत. अशा स्थितीत खाण्यापिण्यात बदल करून निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शरीरातील अशक्तपणा (weakness) ही देखील आजच्या काळातील एक सामान्य समस्या बनली आहे. शरीरातील रक्त खूप कमी झाल्यामुळेही ॲनिमिया (anemia) होऊ शकतो.
हा आजार वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, डोकेदुखी, हात-पाय थंड पडणे, त्वचा फिकट होणे, चेहरा किंवा पाय सुजणे यांसारखी लक्षणे तुम्हालाही जाणवत असतील तर तो अशक्तपणा असू शकतो. अशा परिस्थितीत काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही अशक्तपणा दूर करू शकता.
सफरचंद
ॲन ॲपल अ डे, कीप्स द डॉक्टर अवे… अशी एक इंग्रजी म्हण आहे. म्हणजे दररोज एक सफरचंद खाल्यास डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. हे खरं आहे, कारण नियमितपणे सफरचंद खाल्यास अनेक फायदे मिळतात. सफरचंद हा लोहाचा उत्तम स्त्रोत असून त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोज सफरचंद खाणे फायदेशीर ठरते.
बीट
बीटामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे ते शरीरातील अशक्तपणा पूर्ण करण्यासाठी देखील खूप प्रभावी ठरते. त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांनी बीटाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. आहारात बीटाचा समावेश करून ॲनिमिया टाळता येऊ शकतो.
डाळिंब
शरीरातील रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अतिशय उपयुक्त मानले जाते. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि लोहाने समृद्ध असलेल्या डाळिंबाचे दाणे तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचा रसही पिऊ शकता. त्याचे नियमितपणे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
पालक
पालकाला गुणांची खाण म्हटले तर त्यात काही अतिशयोक्ती होणार नाही. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 6, ए, सी, लोह, कॅल्शिअम आणि फायबर आढळते. तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही पालक खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पालकाच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होऊ शकते.
लाल मांस
लाल मांस हे लोहाचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते. तुम्ही जर मांसाहार करत असाल आणि तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रेड मीटचे सेवन करून तुम्ही शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करू शकता.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)