Insomnia in Kids: निद्रानाशाची समस्या मुलांच्या वाढीसाठी धोकादायक
आधुनिक काळातील जीवनशैलीशी निगडीत चुकीच्या सवयी आणि अनियमित दिनचर्या यामुळे लहान मुलांनाही निद्रानाशाची समस्या सतावते. यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
नवी दिल्ली – बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जात. लहानपण सगळ्यांनाच हवंहवंसं, जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization) केलेल्या एका संशोधनात (research) हे तथ्य समोर आलं आहे की कोविडच्या (covid) कालावधीनंतर मुलांच्या झोपेच्या आणि जागे होण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाला आहे. मात्र हा बदल त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.
असं का होत आहे ?
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ऑनलाइन क्लासेमु सुरू असून त्यामुळे मुलं अभ्यासाच्या निमित्ताने मोबाइल आणि टॅबलेटवर जास्त वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र नियमित शाळा सुरू झाल्यानंतरही मोबाईलची सवय अथवा वापर कमी होताना दिसत नाही. कौटुंबिक वातावरणही यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. मुलं रडू लागली, किंवा त्यांना कंटाळा आला की त्यांचे मनोरंजन करण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात. त्यामुळे लहानपणापासूनच रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि मोबाईलवर गेम खेळणे ही मुलांची सवय बनते. याशिवाय, अभ्यासाचे ओझे आणि समवयस्कांचा दबाव यामुळे काही मुलांना एकटेपणा, दुःख आणि तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही. काही कुटुंबात तर पालक स्वतः रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यामुळे मुलांनाही रात्री उशीरा झोपायची सवय लागते. मग सकाळी झोप पूर्ण होत नाही, तरी तसंच उठवून त्यांना शाळेत पाठवलं जातं.
काय होते नुकसान ?
झोप पूर्ण न झाल्यामुळे मुलांच्या वागण्यात चिडचिडेपणा येऊ लागतो आणि त्यांची स्मरणशक्तीही कमजोर होऊ लागते. जी मुले रात्री उशिरापर्यंत जागी राहतात, त्यांना रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा भूक लागते. या दरम्यान ते चॉकलेट, आइस्क्रीम आणि वेफर्स सारखे जंक फूड खातात. त्यामुळे लठ्ठपणा आणि किशोरवयातील मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. बहुतांश मुलं आजकाल मोबाईलवर जास्त वेळ घालवतात, त्यामुळे त्यांची दृष्टी कमकुवत होत आहे. बाहेर मैदानात किंवा बागेत खेळायला जाण्याऐवजी, मुलं त्यांच्या खोलीत नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशद्वारे मिळणारे व्हिटॅमिन डीचे पोषणही नीट मिळत नाही. परिणामी त्यांची हाडं नीट विकसित होत नाहीत आणि सांधेदुखीची समस्या सतावू लागते.
कसा करावा बचाव ?
– त्यांचा स्क्रीन टाईम कमी करावा. रात्री जेवणापूर्वी सर्वजण आपला मोबाईल सायलेंटवर ठेवतील असा नियम घरात करावा.
– रात्रीच्या जेवणानंतर मुलांना शतपावली करायला आवर्जून घेऊन जावे. त्यामुळे त्यांना शांत व गाढ झोप लागण्यास मदत होईल,
– मुलांना झोपताना एखादी गोष्ट ऐकवा किंवा वाचून दाखवा. चांगली पुस्तके वाचण्याची सवय मुलांमध्ये विकसित करा.
– रात्री आठ वाजेपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्य जेवणासाठी एकत्र येतील, असा नियम करावा. तरंच तुमच्या मुलांना आठ तासांची झोप मिळेल.