Aloe Vera: केवळ त्वचेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही उत्तम आहे कोरफड; जाणून घ्या फायदे
कोरफडीचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करता येते. कोरफडीपासून शरीराला कोणते फायदे मिळतात, ते जाणून घेऊया.
मुंबई : कोरफड (Aloe Vera) त्वचेसाठी (Skin) अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. अनेक उत्पादनांमध्येही कोरफडीचा वापर केला जातो. पण कोरफडीचा उपयोग केवळ सौंदर्यासाठीच (skin care) नव्हे तर आरोग्यासाठीही केला जातो. तिच्यातील औषधी गुणधर्मांमुळे, बरेच लोक कोरफडीचा आहारात (Diet) देखील समावेश करतात. कोरफडीमध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट आणि ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच ॲंटीव्हायरल आणि ॲंटीसेप्टिक गुणधर्मही असतात. कोरफडीपासून शरीराला कोणते फायदे मिळतात, ते जाणून घेऊया.
काय आहेत कोरफडीचे फायदे ?
छातीत जळजळ होणे – पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे हृदयाची जळजळ (Heart Burn) किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यापासून मुक्तता हवी असेल तर कोरफडीचे सेवन करावे. कोरफड खाल्ल्याने पोटातील जळजळ आणि छातीही शांत होते, आराम मिळतो.
ब्लड शुगर – ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफडीचे सेवन करू शकतात. त्यामध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म आहेत. तुम्ही दिवसातून एकदा कोरफडीचा रस पिऊ शकता. तो रस चवीला कडू असतो मात्र आरोग्यासाठी उत्तम ठरतो.
अल्सर – कोरफडीचा वापर माऊथ वॉश म्हणूनही केला जाऊ शकतो. याशिवाय तोंडात आलेले फोड दूर करण्यासाठीही कोरफड प्रभावी ठरते. कोरफडीचे ॲंटीबॅक्टेरियल आणि ॲंटी-फंगल गुणधर्म तोंडातील जंतू दूर ठेवतात. कोरफडीचा रस हा तोंडातील अल्सर बरे करण्यास प्रभावी ठरतो.
बद्धकोष्ठतेपासून आराम – तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कोरफडीचा समावेश करू शकता. कोरफडीचा रस पीठात मळून पोळी बनवता येतो किंवा कोरफडीचा रस पिऊही शकता. याशिवाय सकाळचा नाश्ता करताना एक चमचा कोरफड जेल पाण्यात मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो.
वजन कमी करणे – शरीराचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर कोरफडीचा वापर करणे प्रभावी ठरू शकते. त्यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतो, ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. त्यासाठी जेवण्यापूर्वी कोरफडीचा रस प्यावा.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)