Egg Freezing: एग फ्रीजिंग म्हणजे काय? कोणत्या वयात मिळतो फायदा, किती होतो खर्च? जाणून घ्या प्रक्रिया
आधुनिक काळात बहुतांश महिला या जॉब करतात. करीअरमध्ये बिझी असलेल्या महिलांकडे सध्या लग्न, मूल यासाठी वेळ नाही. पण वयाच्या पुढल्या टप्प्यात त्यांना बाळाची आस असेल तर एग फ्रीजिंगच्या पर्यायामुळे त्यांना आई बनण्याची संधी मिळू शकते. एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय, हे सविस्तर जाणून घेऊया.
नवी दिल्ली – सध्याच्या आधुनिक काळात लोकांची जीवनशैली (lifestyle) पूर्णपणे बदलली आहे. तरूण पिढीची प्राथमिकता हे त्यांचे करीअर आहे. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला त्यांचा जॉब, करीअर महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत लग्न, मूल हे दुय्यम ठरतं. पण आजचा समाज हा विज्ञानावर आधारित असून याच विज्ञानाने एक अशी सुविधा दिली आहे, ज्यामुळे एखादी स्त्री एग फ्रीजिंगचा (Egg Freezing) पर्याय निवडून काही वर्षानंतर त्या अंड्यांच्या सहाय्याने गर्भधारणा (pregnancy) करू शकते व मातृत्वाचा पर्याय निवडू शकते.
साधारणत: महिलांमध्ये गर्भधारणेचे वैज्ञानिक वय 20 ते 30 वर्षे मानले जाते, परंतु करिअर करताना अनेक महिलांना या वयात मातृत्व नको असते. त्यामुळे आजच्या काळात एग फ्रीजिंग ट्रेंड वाढत आहे. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत oocyte cryopreservation म्हणतात. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये गर्भधारणेच्या वास्तविक वयात महिलाकडून अंडी काढून घेतली जातात आणि सुरक्षित ठेवली जातात.
एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय ?
एग फ्रीजिंग किंवा अंडी गोठवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी महिलांची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. एग फ्रीजिंगमुळे गर्भधारणेचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, डॉक्टर महिलेची संपूर्ण तपासणी करतात. एका महिलेच्या शरीरात दर महिन्याला एक अंडे तयार होते. पण प्रत्येक महिन्यात तयार होणारं अंड हे फ्रीज करण्यायोग्य किंवा गोठवण्यास योग्य नसल्यामुळे कोणत्या महिन्याची अंडी जपून ठेवायची हे तपासण्यानंतर कळते.
जर अंड्याचे जतन करण्याचे प्रमाण कमी असेल तर नंतर त्या अंड्यातून गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी असते. म्हणूनच अंडी काढण्यापूर्वी महिलांवर उपचारही केले जाऊ शकतात. जेव्हा अंडी पूर्णपणे निरोगी असतात आणि गर्भधारणा करण्यास सक्षम असता, तेव्हा डॉक्टर अत्यंत काळजीपूर्वक अंडी काढून टाकतात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून त्यामुळे छोटी शस्त्रक्रिया करता येते. या अंतर्गत, अतिशय पातळ सुईने अंडी काढली जाते आणि ती सबझिरो तापमानात गोठवली अथवा फ्रीज केली जातात.
कधी होऊ शकते गर्भधारणा ?
एखादी महिलातिची अंडी 10-15 वर्षं फ्रीज करू शकते अथवा गोठवू शकते. तोपर्यंत अंडी अंडाशयात जशी होती तशाच स्थितीत राहतात. भविष्यात जेव्हा एखाद्या स्त्रीला आई व्हायची इच्छा असेल तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे त्या अंड्याचे फलित केले जाईल आणि ही फलित अंडी स्त्रीच्या शरीरात दाखल करण्यात येतील.
कोणत्या वयात एग फ्रीजिंग केले पाहिजे ?
साधारणपणे महिलांचे गर्भधारणेचे वय 20 ते 30 दरम्यान मानले जाते. त्यानंतर त्यांची प्रजननक्षमता कमी होऊ लागते. मात्र याचा अर्थ असा नव्हे की 30 व्या वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकत नाहीत. पण महिलेच्या शरीरात काही गुंतागुंत निर्माण झाल्यास 30 व्या वर्षानंतर गरोदरपणात अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्या स्त्रियांना अंडी गोठवायची आहेत त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षाच्या आधी अंडी गोठवावीत. एग फ्रीजिंगचे परिणाम लक्षात घेऊन कोणतीही स्त्री या पर्यायाचा अवलंब करू शकते.
किती येतो खर्च ?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत एका वेळी अंडी काढण्याची किंमत 10 हजार डॉलर्सपर्यंत येऊ शकते. यानंतर, अंडी जितके दिवस फ्रीज केली जातात, त्याचा खर्च वेगळा असतो. 10 ते 15 वर्षे अंडी फ्रीज करता येतात. भारतात हा खर्च 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त येऊ शकतो.
कोणत्या महिलांसाठी ठरते फायदेशीर ?
ज्या महिलांना सध्या गर्भधारणा अथवा प्रेग्नन्सी नको आहे, मात्र भविष्यात गर्भधारणेच्या आपल्या क्षमतेबद्दल खात्री हवी आहे, अशा महिला एग फ्रीजिंगचा सुरक्षित पर्याय निवडू शकतात. तसेच, ज्या महिलांना अनुवांशिक रोग, कॅन्सर, किंवा इतर संसर्गाशी संबंधित रोग किंवा ज्यांचे अवयव निकामी आहेत त्यांच्यासाठी एग फ्रीजिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)