लठ्ठपणामुळे मुलांना या खतरनाक आजाराचा धोका, दिसतात ही लक्षणं
गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Obesity in kids : लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा ही आरोग्याची मोठी समस्या बनली आहे. फास्ट फूड आणि आरामदायी जीवनशैलीमुळे लहान मुलं सहजच लठ्ठपणाला (Obesity in kids) बळी पडत आहेत. वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेहासारख्या (diabetes) घातक आजाराच्या विळख्यात येण्याचा धोका वाढत आहेत. टाईप-2 मधुमेहाची समस्या असलेल्या मुलांमध्ये इतर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे या आजाराची लक्षणेही सहजासहजी बाहेर दिसत नाहीत.
डायबेटीस झाल्यास प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर वाढत्या वयाबरोबर हा आजार आणखी वाढू शकतो. मधुमेहामुळे मुलांच्या हृदयावर आणि मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत वेळीच त्याचे निदान करून त्यावर योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे.
मुलांमध्ये दिसतात मधुमेहाची ही लक्षणे
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मुल खूप जास्त दमणे, त्यांना खूप थकवा येणे, वारंवार लघवीला जाणे आणि खूप तहान लागणे ही मधुमेहाची सुरूवातीची लक्षणे असू शकतात. जर एखादं मूल लठ्ठ असेल आणि या समस्या दिसत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही लक्षणे वेळीच ओळखून या आजारावर उपचार आणि नियंत्रण करता येते.
ही लक्षणे दिसल्यास मुलांच्या रक्तातील साखरेची तपासणी करावी असा सल्ला दिला पालकांना दिला जातो. शरीरातील साखरेची पातळी वाढल्यास डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा.
मधुमेहावर असे ठेवा नियंत्रण
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मुलांच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांनी दररोज व्यायाम केला पाहिजे. पार्कमध्ये जाऊन खेळले पाहिजे आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी झाला पाहिजे. अशा परिस्थितीत मुलांच्या आहारकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यांना फास्टफूड बिलकूल देऊ नये. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आधीच मधुमेह असेल तर मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणतीही लक्षणे नसली तरीही साखरेची पातळी तपासत रहावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)