थंडीत तुमच्या डोळ्यांनाही होतो का हा त्रास ? जाणून घ्या कसा करावा बचाव
डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. हिवाळ्याच्या दिवसात त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जणांना कंजेक्टीव्हायटिस (Conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याला पिंक आय असेही म्हणतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण हा त्रास आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवाला, डोळ्यांना (eyes) होतो. याच डोळ्यांद्वारे आपण संपूर्ण जग पाहू शकतो, रोजची कामं करू शकतो. आपला चेहरा आणि तोंड धुण्यासाठी आपण सर्वोत्तम प्रॉडक्ट्स वापरतो, पण ज्या डोळ्यांमुळे आपण सर्व जग पाहतो, त्यांची पुरेशी काळजी आपण घेत नाही. विशेषत: थंडीच्या दिवसांत डोळ्यांची नीट काळजी घेणे (eye care) गरजेचे असते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले कसे राखावे आणि डोळे येण्याच्या अथवा कंजेक्टीव्हायटीसच्या समस्येपासून बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.
थंडीच्या दिवसात कंजेक्टीव्हायटीसचा त्रास वाढू शकतो, कारण या दिवसांत गार वारा वेगाने वाहत असतो, ज्यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होऊ शकतो व ते कोरडे पडू शकतात. या स्थितीत आपले डोळे जड होतात, काही वेळा सुजतातही आणि खाज येऊ लागते. मात्र अशा वेळेस डोळ्यांना वारंवार हात लावणे रोखावे, असा सल्ला डॉक्टर देतात. अन्यथा खाजवून अजून त्रास होऊ शकतो.
कंजेक्टीव्हायटीस पासून वाचण्याचे उपाय :
– गरम पाणी गार करून त्याने डोळे धुवावेत. यामुळे वारंवार खाज येण्याचा त्रास कमी होतो.
– कंजेक्टीव्हायटीस किंवा डोळे लाल झाले असतील तर दिवसातून तीन-चार वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. पुरेशी झोप घ्यावी.
– कॉन्टॅक्ट लेन्सेस घालू नयेत.
– डोळ्यातून येणारे पाणी पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा.
– काजळ, मस्कारा, आय लॅशेस यांसारखी आपली सौंदर्य प्रसाधने इतरांसोबत शेअर करू नयेत.
– झोपण्याची चादर, उशीचा अभ्रा आणि पांघरूण दर आठवड्याला बदलावे व स्वच्छ धुवावे.
– पाण्यात तुरटी घालून त्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. त्यामुळे पापण्या एकमेकांना चिकटण्याचा त्रासही कमी होऊ शकतो.
– डोळ्यांना खूप त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)