मधुमेहींनी ड्रायफ्रुट्स खावेत की नाही? जाणून घ्या कोणते ड्रायफ्रुट्स ठरतात फायदेशीर
मधुमेह हा अतिशय गंभीर आजार आहे, एकदा तो झाला की रुग्णासोबत कायमच राहतो. त्याचा संपूर्णपणे इलाज नसला तरी लाइफस्टाइलमध्ये बदल करून तो नियंत्रणात ठेवता येतो.
नवी दिल्ली – ड्राय फ्रुट्स (dry fruits) खाणे प्रत्येक व्यक्तीला आवडते आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीरही असतात. त्यामुळे शरीराला अनेक प्रकारची पोषक तत्वं मिळतात, म्हणूनच निरोगी शरीरासाठी ड्रायफ्रुट्स खूप महत्वाची आहेत. मनुका सारखी अनेक ड्रायफ्रुट्स असतात की ती उन्हात वाळवली तर त्यातील अँटी-ऑक्सिडंट्सचे (antioxidant) प्रमाण खूप वाढते. सुका मेवा किंवा ड्राय फ्रुट्स यांच्यामध्ये प्रोटीनचे (protein) प्रमाण कमी असते तर फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते.
खरंतर सुका मेवा खाणे हा सर्वांसाठीच फायदेशीर असतो, पण मुधमेह झालेल्या लोकांबद्दल बोलायचे तर ते सुका मेवा खाऊ शकतात की नाही, ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते की हानिकारक असा प्रश्न पडतो. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण दैनंदिन आहार आमि जीवनशैली यामध्ये थोडासाही बदल किंवा निष्काळजीपणा झाल्यास बराच त्रास होऊ शकतो. मधुमेहाचे रुग्ण देखील ड्राय फ्रुट्स खाऊ शकतात पण त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी लागते. ड्राय फ्रुट्स खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
– मधुमेही रुग्णांमध्ये मनुकांबाबत अनेक शंका असतात. पण मधुमेहाचे रुग्ण मनुका मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात. त्याची पावडर वापरल्यास आणखीनच फायदा होतो. त्याची पावडर जळजळ आणि इन्सुलिन स्राव सुधारते. मर्यादित प्रमाणात वापरल्यास रक्तातील साखर वाढण्याची शक्यता फारच कमी असते.
– मधुमेहाच्या रुग्णांनी सुका मेवा मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर आणि वजन वाढण्याचा धोका खूप कमी असतो. मात्र, सुक्या मेव्याच्या सेवनासोबतच त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचाही अवलंब करणे महत्वाचे ठरते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज थोडा वेळ व्यायाम केला पाहिजे. खजूर आणि मनुका यांचे जास्त सेवन करू नये.
– जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल आणि तुमची शारीरिक हालचाल कमी असेल तर तुम्ही मनुका कमी प्रमाणात खावीत. पण जर तुम्ही पुरेशा प्रमाणात चालत असाल तर तुम्ही भरपूर मनुका खाऊ शकता.
– तुम्हाला जर मधुमेह झाला असेल तर तुम्ही अक्रोड, बदाम, पिस्ता, अंजीर, जर्दाळू यांसारखे ड्रायफ्रूट्स ठराविक प्रमाणात सेवन करू शकता.