Breakfast Benefits : ब्रेकफास्ट कराल तर सदृढ रहाल, अनेक आजारांपासून होऊ शकते रक्षण
जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर सावध होऊन काळजी घेण्याची वेळ आली आहे. वास्तविक, नाश्ता न केल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
नवी दिल्ली : आजचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की अनेकजण सकाळचा नाश्ता (breakfast) करायला विसरतो अथवा नाश्ता स्किप करतात. सकाळी उठायचं आणि पटपट आवरून ऑफिसला निघायचं. यादरम्यान वाटेत ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन करणे किंवा गाडीत धक्के खात कसंतरी ऑफीस गाठणं हा अनेकांचा दिनक्रम असतो. यामुळेच एवढं थकायला होतं की अनेकांना भूक (hungry)लागलेली पण कळत नाही आणि दिवसातील सर्वात महत्वाचा आहार, ब्रेकफास्ट करतच नाहीत. तर काही लोक असेही आहेत जे सकाळी नाश्ता करत नाहीत. असे केल्याने ते निरोगी राहतात आणि वजन वाढत नाही (weight control) असं त्यांना वाटतं. पण हे अतिशय चुकीचं आहे.
सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा (breakfast is important)असतो. नाश्ता वगळण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, कारण काहीही असो, पण आपण चुकूनही नाश्ता करणं बंद करू नये. याचे कारण म्हणजे न्याहारी केल्याने अनेक आजार बरे होतात आणि त्यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.
नाश्ता टाळणे घातक
वजन वाढतं म्हणून अनेक लोक बऱ्याच वेळेस सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण ते अतिशय घातक असून नाश्ता न केल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. मात्र यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
कॅन्सरपासून बचाव करतो ब्रेकफास्ट
खरंतर, एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी व्यक्ती सकाळी नाश्ता करते, त्या व्यक्तीला कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक या आजाराला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर नाश्ता केला तर त्याला कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. यासोबतच ती व्यक्ती अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहते.
अभ्यासात काय नमूद करण्यात आले आहे ?
एका अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीने नाश्ता केला नाही तर त्याची संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होते. यामुळे व्यक्ती हृदयविकारापासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांना बळी पडू शकते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील इकान स्कूल ऑफ मेडिसिनच्या टीमने हा अभ्यास केला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले की, नाश्ता न केल्यामुळे मेंदूमध्ये अनेक प्रकारचे रिस्पॉन्स होतात, ज्याचा रोगप्रतिकारक पेशींवर नकारात्मक परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत अन्न न मिळाल्याने शरीरावर परिणाम का होतो हे समजून घेण्यास देखील हा अभ्यास मदत करतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)