Health Tips : जेवणानंतर शतपावली करण्याचे अनोखे फायदे, केवळ वजनच कमी होत नाही तर मिळतो ‘हा’ लाभ
निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, मात्र व्यस्त जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली कमी होत आहेत. अशा परिस्थितीत रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालून स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता.
नवी दिल्ली : आपले शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेण्यासोबतच व्यायाम (exercise) करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांची शारीरिक हालचाल कमी होत आहे. तसेच खाण्याच्या अयोग्य सवयींमुळे लोकांचे वजन वाढत (weight gain) आहे. तसेच ते अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. आपण दररोज किती व्यायाम करावा, यासाठी कोणताही नियम अथवा मर्यादा नाही. आपण कुठला व्यायाम प्रकार करतो यावर ते अवलंबून असते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका (walking) मारून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता.
रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे खूप महत्वाचे आहे. आपले वाडवडीलही रात्रीच्या जेवणानंतर एकाच जागी न बसता थोडा वेळ चालण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे अन्नपचन लवकर होण्यास मदत होते तसेच गॅसेसही त्रास होत नाही. तुम्हीही रात्रीचे जेवण करून लगेच झोपायला जात असाल तर तुमची ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे थोडा वेळ चालायला जावे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. ते लाभ कोणते हे जाणून घेऊया.
पचनासाठी फायदेशीर
रात्रीच्या जेवणानंतर रोज चालायला गेल्यासत राहिल्यास पचनक्रिया सुधारते. याच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या टाळू शकता.
प्रतिकारशक्ती वाढते
रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे संक्रमण आणि आजार टाळू शकता. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रणात राखते
ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालणे खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे मधुमेहग्रस्तांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी चयापचय दर अर्थात मेटाबॉलिज्म रेट खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करावी. चालण्यामुळे मेटाबॉलिज्म तर वाढतेच पण मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. जास्त कॅलरी जाळल्यामुळे वजनही लवकर कमी होऊ शकते.
चांगल्या झोपेसाठी फायदेशीर
रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने चांगली झोप लागते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि चांगली झोप घेता येते. शांत झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिकही राहता.