महिलांनो, व्हाईट डिस्चार्ज, खाज, जळजळ.. याकडे करू नका दुर्लक्ष, तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं आणि लक्षणेही
योनीतून व्हाईट डिस्चार्ज अथवा पांढरा स्त्राव होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु काही वेळा पांढर्या स्त्राव दरम्यान खाज सुटणे किंवा जळजळ देखील जाणवते. हे खूप त्रासदायक व गंभीरही ठरू शकते.
नवी दिल्ली : महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे ( woman health) दुर्लक्ष करतात. वैयक्तिक स्वच्छतेकडेही त्यांचे बऱ्याच वेळेस दुर्लक्षच होते. पण कधीकधी सामान्य किंवा लहान दिसणारी आरोग्य समस्या देखील मोठे आणि धोकादायक रूप धारण करू शकते. यापैकी एक म्हणजे महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्जची समस्या. त्याला ल्युकोरिया असेही म्हणतात. स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज (white discharge) सामान्य आहे, जो मासिक पाळीपूर्वी आणि ओव्हुलेशनच्या वेळी जास्त असतो. हे गर्भधारणा, प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग किंवा हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे (hormonal imbalance) देखील होऊ शकते.
ही एक सामान्य गोष्ट आहे, पण व्हाईट डिस्चार्जच्या वेळी बर्याच वेळा खाज सुटणे, जाड आणि पिवळ्या रंगाचा स्राव येणे, जास्त दुर्गंधी येणे, असा त्रास सतत अनेक दिवस होत असल्यास चुकूनही दुर्लक्ष करू नये. व्हाईट डिस्चार्ज का होतो, त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया.
व्हाईट डिस्चार्ज का होतो ?
व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारचा असू शकतो, त्यापैकी काही अगदी सामान्य आहेत. मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर आणि ओव्हुलेशनच्या वेळी, स्त्रियांना हा त्रास होतो. त्याशिवाय योनीमध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनमुळे देखील व्हाईट डिस्चार्जची समस्या उद्भवू शकते. जर स्त्राव खूप पांढरा, जाड, पिवळ्या रंगाचा असेल आणि महिनाभर चालू राहिल्यास, त्यामुळ तुमचे अंतर्वस्त्र ओले होते असेल तसेच त्याचा मासिक पाळीशी संबंध नसेल तर हे गंभीर असू शकते. अशा परिस्थितीत त्याची कारणे जाणून घेण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीद्वारे हे समजू शकते की हे कोणत्या संसर्गामुळे होत आहे की नाही. कर्डी व्हाईट डिस्चार्ज म्हणजे हा फंगल इन्फेक्शन असू शकते.
व्हाईट डिस्चार्ज सोबतच योनीमार्गात खाज सुटणे, जळजळ होणे, लघवी करताना जळजळ होणे किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर योनीमार्गात जळजळ होणे, असा त्रास होत असेल तर ही सर्व लक्षणे गंभीर असू शकतात. अशा परिस्थितीत, तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन यामागचे कारण शोधून योग्य उपचार करता येतील. या सर्व गोष्टी पुन्हा-पुन्हा दिसत असतील डिस्चार्ज तपासणीसाठी पाठवली जातो. मग त्यावर अँटी-बायोटिक्स देऊन उपचार केले जातात.
व्हाईट डिस्चार्जचे प्रकार
व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारचे असू शकते. सर्वात सामान्य पांढरा आणि जाड स्त्राव आहे. यासाठी घाबरण्याची गरज नाही. मात्र जास्त जळजळ किंवा खाज येत असल्यास, डॉक्टरांना भेटा. याशिवाय काही महिलांच्या योनीतून पिवळसर स्त्राव होतो, मात्र तो सामान्य नाही. हे संसर्गामुळे होऊ शकते. काही वेळेस असुरक्षित शारीरिक संबंधामुळेही हा त्रास होऊ शकतो. तपकिरी किंवा हिरवा स्राव देखील असू शकतो. तपकिरी स्त्राव अनियमित मासिक पाळी, रजोनिवृत्तीमुळे देखील होऊ शकतो. त्याच वेळी, हिरवा स्त्राव हा बॅक्टेरिअल किंवा लैंगिक संसर्गामुळे होऊ शकतो. असे झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटून तपासणी करावी.
व्हाईट डिस्चार्जमुळे होणारे आजार
जर सतत जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर ते कदाचित यीस्ट इन्फेक्शन, गोनोरिया, गर्भाशयाच्या तोंडावर कोणतीही समस्या आणि बऱ्याच बाबतीत कॅन्सर दर्शवू शकते.
व्हाईट डिस्चार्जची लक्षणे
– योनीमध्ये जळजळ होणे
– खाज सुटण्याची समस्या
– वारंवार लघवी, वेदना
– शारीरिक संबंध करताना वेदना, जळजळ होणे
– पेल्विक भागात वेदना होणे
– काही प्रकरणांमध्ये ताप येणे
– मासिक पाळीत खूप त्रास होणे, पाठदुखी
– खाजगी भागात सूज येणे
वैयक्तिक स्वच्छता महत्वाची
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही व्हाईट डिस्चार्ज अथवा ल्युकोरियाची समस्या टाळू शकता. यासाठी सैल, सुती अंडरवेअर घालावी. ती धुताना डेटॉल आणि कोमट पाण्याने, तसेच इतर कपड्यांपासून वेगळी धुवा. त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदाराची, पतीची अंतर्वस्त्रे देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे. बाहेरचे टॉयलेट वापरत असाल तर ते स्वच्छ असावे, टिश्यू पेपरने स्वच्छ केल्यानंतरच ते वापरावे. खूप जुने अंडरवेअर घालू नका. एकदा गर्भाशयात संसर्ग झाला तर वंध्यत्व, मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे, ओटीपोटाच्या भागात दुखणे, असा त्रास होऊ शकतो, जो बरा करणे फारसे सोपे नाही.