क्या करें क्या न करे ये कैसी मुश्किल हाय ! बिकिनी वॅक्स खरंच गरजेचं आहे का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात …
Risk of Bikini Wax : सध्या फॅशन म्हणून बिकिनी वॅक्स करण्याचा ट्रेंड वाढतच चालला आहे. पण ते खरोखर किती गरजेचं आहे, त्यामुळे काय तो तोटे होतात, हे स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : सध्या बिकिनी वॅक्सचा ट्रेंड (Bikini wax) खूप वाढला आहे. बहुसंख्य तरूणी पार्लरमध्ये जाऊन किंवा काही सौंदर्य उत्पादनांच्या सहाय्याने शरीराच्या नाजूक भागातील केस काढून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र शरीराच्या एवढ्या नाजूक भागातील केस काढण्याचा उद्देश नेमका काय ? आणि त्याची खरंच गरज असते का ? मुळातच निसर्गाने आपल्या शरीराची रचना काही कारणास्तव केली आहे, असे असताना बिकिनी वॅक्स खरंच गरजेचं आहे का, त्याचे दुष्परिणाम (side effects) काय आहेत, याबद्दल स्त्रीरोग (gynecologist) आणि वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बिकीन वॅक्स म्हणजे काय ? यासंदर्भात डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी लिहीलेली पोस्ट खालीलप्रमाणे :
काही दिवसांपूर्वी एक तरुण सुंदर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत घाईघाईत क्लिनिक मध्ये आली.वेदनेने पिळवटलेला तिचा चेहरा बघून रिसेप्शनिस्ट ने लगेच तिला आत पाठवलं. “मॅम माझं लग्न आहे म्हणून बिकिनी वॅक्स करायला गेले होते तर ते करताना त्या भागात मोठी जखम झाली आणि खूप ब्लिडींग सुरू झालं आहे.मला खूप भीती वाटतेय मॅम” असं म्हणत तिने रडायलाच सुरुवात केली.
तिला धीर देऊन शांत करून तपासले तर योनीमार्गाच्या अतिशय नाजूक भागात चांगला मोठा कट गेला होता चक्क!!! नशिबाने साधे उपचार करून टाका घ्यावा न लागता ब्लीडिंग थांबलं आणि मग जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून औषधे देऊन तिची रवानगी केली पण त्याआधी तिचं बौद्धिक घेतलंच.
बिकिनी वॅक्स म्हणजे नेमकं काय ?
सर्वात आधी बिकिनी वॅक्स म्हणजे नक्की काय हे माहीत नसलेल्या लोकांसाठी हा काय प्रकार आहे हे समजूनन घेऊया. तर एखाद्या स्त्रीच्या योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस वॅक्सिंग करून काढून टाकणे, जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा बिकिनी वॅक्स करण्याचा उद्देश असतो. महिलेच्या शरीरातील हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे चांगलेच वेदनादायक असते. तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही हे नियमित करून घेतात.
बिकिनी वॅक्स करण्याचे कारण काय ?
बऱ्याच जणी हे पुरुषांना आवडते म्हणून करत असाव्यात. प्रथमदर्शनी विचार करताना खरं तर असं वाटतं की अजिबात केस नसलेला बाल्यावस्थेत असल्यासारखा दिसणारा योनीमार्ग पुरुषांना का आवडत असेल? मग जरा खोलवर जाऊन विचार केला तर हल्लीच्या तरुण पिढीवर पोर्नोग्राफीचा असलेला प्रभाव हे कारण असू शकेल असं वाटतं.या फिल्म्स मध्ये दाखवत असलेली पूर्णतः केसविरहित शरीरे आणि अवास्तव चित्रण तरुण पिढीची दिशाभूल करत असावी का अशी शंका येते.आजच्या वयात येणाऱ्या आणि तरुण पिढीला पोर्नोग्राफी बघणे फारच सोपे झाले आहे पण त्याचे त्यांच्या लैंगिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे.
आता शास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयाकडे बघूया. स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनीमार्गाचे संरक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जीवाणूंचे वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते. या जिवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकार शक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो.
हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा वॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात ,दुखावली जातात. त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो. परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात. कोरडा पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते तसेच खाज सुटू शकते.
ह्या एवढ्या सगळ्या समस्या सगळे केस मुळासकट काढण्याच्या अट्टाहासामुळे होऊ शकतात. आणि वर नमूद केलेल्या मुलीच्या बाबतीत जशी मोठी इजा झाली तसे काही घडले तर हा प्रकार अजूनच धोकादायक ठरतो. पूर्वी स्त्रीरोग तज्ञ कोणतीही शस्त्रक्रिया करायच्या आधी योनिमार्गाच्या भागातले सगळे केस काढायला सांगायचो पण यामुळे नंतर जंतुसंसर्ग वाढू शकतो असं लक्षात आल्यावर आता गरज असेल तेवढेच केस काढले जातात.
योनीमार्गाच्या भागातले केस समूळ काढण्यापेक्षा कात्रीने काळजीपूर्वक कमी करणे हे सर्वात योग्य आहे. त्यामुळे स्वच्छ्ता पण राखली जाते आणि बाकी त्रास होत नाही. या भागात अजिबात स्वच्छता न करणेही चुकीचे आहेच. त्यामुळे अजून वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. गृमिंग करावेच पण त्यात सुरक्षितता असावी.
म्हणूनच सौंदर्याच्या काहीतरी विचित्र कल्पना मनाशी पक्क्या धरून उगाच स्वतः च्या शरीराचे असे हालहाल का करून घेण्यापेक्षा त्यावर विचार करून आणि योग्य ती माहिती घेऊन मगच अशी पावलं टाकावीत.