आर्थ्रायटिसची लक्षणे कशी ओळखावीत ? संधिवात कसा नियंत्रित ठेवावा ?
सभोवतालच्या तापमानात अचानक घट होणे हे संधिवात असलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
नवी दिल्ली – सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हिवाळ्याचे (winter) दिवस जास्त आव्हानात्मक असतात. कारण थंड वाऱ्यामुळे सांध्यामध्ये (joint pain) तीव्र वेदना होतात. सभोवतालच्या तापमानात अचानक घट होणे हे संधिवात असलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. जसजसे तापमान कमी होते तसतशा केशवाहिनी (capillaries) अरुंद होत जातात आणि त्यामुळे जडपणा वाटू लागतो तसेच सांधेही सुजतात. थंड हवेमुळे हात आणि पायांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि शरीरात व्हिटॅमिन डीची पातळीही कमी होते, ज्यामुळे हाडं आणि सांधे कमकुवत होतात.
आर्थ्रायटिस किंवा संधीवात ही सांध्यांची एक सामान्य समस्या आहे, त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक सांध्यांमध्ये वेदना जाणवतात, तसेच सूज येते आणि ते अतिशय नाजूक होतात. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र, ज्या व्यक्तींच्या कुटुंबात सांधेदुखीचा इतिहास आहे किंवा पूर्वी सांधेदुखी व लठ्ठपणाचा त्रास जाणवला होका, अशा लोकांना संधिवाताचा त्रास होण्याचा अधिक धोका असतो.
सांधेदुखीची सर्वात सामान्य लक्षणे अथवा चेतावणी देणारी चिन्हे (warning signs) आहेत, जी माहीत असणे आवश्यक ठरते. तसेच सांधेदुखीचा गंभीर त्रास टाळण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्सचे पालन करता येऊ शकते.
सकाळी (सांध्यामध्ये) कडकपणा जाणवणे
शरीरातील ताठरपणा अथवा कडकपणा हा एक तासापेक्षा जास्त काळ टिकणारा असेल तर ते संधिवात असल्याचे लक्षण असते, विशेषत: सकाळी उठल्यावर किंवा खुर्चीवर बराच वेळ बसल्यानंतर हा त्रास जाणवू शकतो.
सतत वेदना होणे
संधिवातामुळे सतत वेदना सतत होऊ शकतात किंवा थोड्या-थोड्या वेळाने वेदनांचा भर ओसरू शकतो. तुम्ही काही हालचाल करत असाल किंवा विश्रांती घेत असाल तरी शरीराच्या एका भागात किंवा अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना होऊ शकतात.
जळजळ आणि सूज
सांध्यामध्ये सूज आणि जळजळ होणे यांचा सांधेदुखीशी संबंध असतो. यामुळे प्रभावित असलेल्या भागावरील त्वचा लाल होऊ शकते आणि सूज येऊ शकते. जर सूज 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उठण्यास त्रास होणे
पलंगावरून किंवा खुर्चीवरून उठणे कठीण होण्याइतपत वेदना जाणवत असतील तर हे सांध्यामध्ये वेदना किंवा संधीवाताचे लक्षण असू शकते.
हिवाळ्यात सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स :
– सक्रिय रहावे आणि हालचाल करत रहा. दिवसभरात काही ना काही व्यायाम करत रहा किंवा चालायला जा.
– सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आपले शरीर उबदार ठेवावे. तुमचे हात आणि पाय हे लोकरीचे हातमोजे- पायमोजे यांनी झाकून ठेवावे.
– निरोगी वजन राखा. वजन जास्त वाढू देऊ नका. तुमच्या फिजीओथेरपिस्टने सुचवलेले व्यायाम नियमितपणे करावेत.
– हायड्रेटेड रहा, दिवसभरात पुरेसे पाणी प्या. हिवाळ्यात गरम चहा किंवा सूपचा आस्वाद घ्या.
– व्हिटॅमिन डी च्या पातळीवर लक्ष ठेवा. घराबाहेर थोडा वेळ घालवा. सूर्यप्रकाशात बसा.
– जे सांधे दुखत असतील तिथे हलक्या हाताने मसाज करा.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)