Passive Smoking बद्दल ‘हे’ माहीत आहे का ? धूम्रपान न करणाऱ्यांनाही पोहोचतो धोका
धूम्रपानामुळे केवळ सिगारेट ओढणारी व्यक्तीच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्रास होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. पॅसिव्ह स्मोकिंग इतरासांठी कसे धोकादायक ठरते ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली : धूम्रपान करणे (smoking) हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे जगातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. त्याच्या दुष्परिणामांचीही सर्वांना पुरेषी कल्पना असतेच. धूम्रपान केल्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) अहवालानुसार, धूम्रपान केल्यामुळे दररोज 14 लोकांचा जीव जातो. मात्र सिगारेट ओढणारेच नव्हे तर आजूबाजूला उभ्या असलेल्या किंवा वावरणाऱ्या लोकांनाही त्रास होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) म्हणतात. पॅसिव्ह स्मोकिंग हे काय असते व ते आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहे हे जाणून घेऊया.
पॅसिव्ह स्मोकिंग बद्दल जाणून घ्या
सिगारेट, विडी आणि सिगार यांच्या धुराचे अवशेष हवेत राहतात. या विषारी धुराचे अवशेष मानवी कपडे, केस, त्वचा, सामान, खोली, कार, कार्पेट आणि अगदी लहान मुलांची खेळणी यांनाही चिकटतात. सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणारे हे विषारी घटक रासायनिक रिॲक्शन देतात आणि कालांतराने ते अधिक धोकादायक बनतात. जरी एखाद्या व्यक्तीने धूम्रपान केले नसेल पण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने सिगारेट किंवा विडी ओढली असेल अशा खोलीत धूम्रपान न करणारी ती व्यक्ती बसली तरी तो मनुष्य सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ शकतो. पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये अशी घातक रसायने असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते.
गर्भवती महिलांना असतो जास्त धोका
पॅसिव्ह स्मोकिंग हे बहुतेक गर्भवती महिलांना प्रभावित करते. यासोबतच त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरही त्याचा निश्चितच परिणाम होतो. एका संशोधनानुसार पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जन्माला न आलेल्या मुलांच्या फुफ्फुसांच्या विकासात अडथळा येतो. तसेच यामुळे बाळाच्या जन्मानंतर श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर रहावे. तसेच कामानिमित्त बाहेर पडतानाही विशेष काळजी घ्यावी.
रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम
गरोदर महिलांशिवाय लहान मुलांवरही पॅसिव्ह स्मोकिंगचा परिणाम दिसून येतो. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे दमा, कानात संसर्ग होणे, वारंवार आजारी पडणे आणि न्यूमोनिया यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. याशिवाय स्वादुपिंड, किडनीचे आजार, तोंडाचे आजार अशा समस्याही उद्भवू शकतात. तसेच घशाशी संबंधित समस्याही उद्भवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लहान मुलं आसपास असताना विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.