Lung Cancer: सिगरेट न पिणाऱ्यांनाही वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका, काय आहे कारण?
एखाद्याला जर फुफ्फुसाचा कर्करोग झाला तर तो नक्कीच धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करत असावा असा सर्वसामान्यांचा समज आहे, मात्र नवीन संशोधनात झालेला खुलासा धक्कादायक आहे.
धूम्रपान आणि तंबाखूला सहसा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे कारण (Lung Cancer reason) मानण्यात येते, मात्र नव्याने समोर आलेल्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, धुम्रपान न करणार्यांनाही (Non smoker) फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, 2020 मध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यामुळे जगभरात दरवर्षी 18 लाख मृत्यू होत आहेत.
लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनात असे म्हटले आहे की फुफ्फुसाच्या कर्करोगाची अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये धूम्रपान भूमिका बजावत नाही. जाणून जागेवर याचे कारण..
वायू प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका
संशोधकांचे म्हणणे आहे की, वायू प्रदूषण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण बनले आहे. यातून फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. हवेतील प्रदूषणाचे अत्यंत सूक्ष्म कण अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतात. त्यांना पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 असे म्हणतात. ते इतके बारीक असतात की ते श्वास आणि तोंडाद्वारे सहजपणे शरीरात पोहोचतात आणि हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांना नुकसान करतात.
असा होतो प्रदूषित हवेमुळे कर्करोग
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे संशोधक डॉ चार्ल्स स्वांटन म्हणतात, पीएम 2.5 सूक्ष्म कण फुफ्फुसात पोहोचतात आणि एकत्रित होतात. प्रथम उत्परिवर्तन नंतर हळूहळू ट्यूमर बनवतात. जसजशी एखादी व्यक्ती मोठी होते तसतसे काही पेशी ज्या सामान्यत: सक्रिय नसतात त्या वायुप्रदूषणामुळे उत्परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जातात आणि त्यांचा प्रसार होऊ लागतो. या पेशी ट्यूमर बनवतात.
संशोधनात काय सिद्ध झाले?
मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, संशोधकांनी इंग्लंड, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील 463,679 लोकांचा आरोग्य डेटा घेतला. डेटा तपासल्यावर फुफ्फुसाचा कर्करोग आणि वायू प्रदूषण यांच्यात संबंध आढळून आला. उंदरांवरील संशोधनात हे सिद्ध झाले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, उंदरांवरील संशोधनात असे समोर आले आहे की, हवेतील प्रदूषणाची पातळी जसजशी वाढते, तसतशी ट्यूमरची तीव्रता, आकार आणि संख्या वाढते.
संशोधक एमिलिया लिम यांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाची अशी अनेक प्रकरणे आहेत. जेव्हा रुग्णाला लक्षात आले की, धूम्रपान करत नसूनही त्याला कर्करोग आहे. खरं तर, जगभरातील 99 टक्के लोक अशा ठिकाणी राहतात जिथे प्रदूषणाची पातळी डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा खूप जास्त आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 117 देशांतील 6 हजारांहून अधिक शहरांतील हवेच्या गुणवत्तेची पातळी तपासण्यात आली. या तपासणीत बहुतांश देशांमध्ये हवेची गुणवत्ता खराब असल्याचे आढळून आले. त्यापैकी बहुतांश मध्यम उत्पन्न देशांचा समावेश होता.