Men’s Health : वाढत्या वयासोबत आजारांचाही धोका… पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा…
चाळीशीनंतर महिलांनीच नव्हे तर, पुरुषांनीही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही चाळीशीनंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही आजारांचे तर, लक्षणही दिसत नाहीत परंतु, पुरुषांना त्याचा खूप जास्त धोका असतो.
अनेकदा महिलांना वयानुसार त्यांच्या आरोग्याबाबत सावध (Be careful about health) राहण्याच्या सूचना दिल्या जातात, मात्र पुरुषही या बाबतीत मागे नसतात. वयाच्या 40च्या आसपास पुरुषांचे शरीरदेखील संवेदनशील बनते. वयाच्या या टप्प्यावर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये (In family responsibilities) त्यांना भविष्याची काळजी वाटू लागते. शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वाढते. त्यामुळे ताणतणाव वाढतो आणि सर्व आजार त्यांना घेरायला लागतात. तुमचीही वयाची चाळीशी गाठणार असाल, तर आत्ताच सावध व्हा, जेणेकरून वेळेपूर्वी येणाऱ्या सर्व समस्यांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. काही आजारांची कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. परंतु, पुरुषांच्या आरोग्यांला त्याचा मोठा धोका होऊ शकतो. यासाठी पुरुषांनी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा मधुमेह, स्नायूमध्ये कमजोरी आणि तणाव (Muscle weakness and tension), नैराश्याचाही सामना वयाच्या चाळीतील पुरुषांना करावा लागतो.
मधुमेहाचा धोका वाढणे
वाढत्या वयानुसार शरीराचे वजनही वाढते. अशावेळी मधुमेहाचा धोका वाढतो. तणावामुळे त्याचा धोका आणखी वाढतो. जर मधुमेहाबाबत तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत, आपण खूप सतर्क असणे आवश्यक आहे. यासोबतच आहारावर नियंत्रण ठेवण्याची आणि नियमित व्यायामाचीही गरज आहे.
स्नायूमध्ये कमजोरी
आपल्या शरीराची हालचाल स्नायूंमुळे होते. 40च्या आसपास स्नायू कमकुवत होऊ लागतात. स्नायू कमकुवत झाल्यामुळे फ्रॅक्चरची शक्यताही अनेक पटींनी वाढते. त्यांना सशक्त बनवण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार आवश्यक आहे. पण आजच्या जीवनशैलीमुळे अन्न आणि शारीरिक श्रम संपुष्टात आले आहेत. सोयीमुळे लोकांचे शरीर वेळेआधीच साथ सोडत आहे.
तणाव आणि नैराश्य
वयाच्या 40व्या वर्षी पुरुषांना आर्थिक सुरक्षेची चिंता वाटू लागते. त्याचबरोबर आजच्या काळात नोकरीचे दडपणही खूप वाढले आहे. यामुळे त्यांना तणाव आणि मूड स्विंगचा त्रास होतो. स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागतो. ही अशी वेळ आहे जेव्हा पुरुषांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च दबावाचा सामना करावा लागतो. मुलांच्या करिअरची चिंता सतावू लागते. दुसरीकडे, पुरुषांना घाईघाईने त्यांचे त्रास शेअर करणे आवडत नाही. अशा स्थितीत त्यांच्या मनाचा गोंधळ होतो. यामुळे अनेकवेळा ते डिप्रेशनमध्येही जातात. मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा नियमितपणे करावी.
विशेष लक्ष हवे
याशिवाय पुरुषांना चाळीशीनंतर सतत डोकेदुखी, सांधेदुखी अशाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तरुणपणातील उत्साह आणि कामाची गती कायम ठेवायची असल्यास, पुरुषांना आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.