पावसाळ्यामध्ये कानामधील फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. या गोष्टींच्या घ्या काळजी जेणेकरून फंगल इन्फेक्शन होणार नाही.
मुंबई : पावसाळ्याला सुरूवात होताच, सर्वच वयोगटात कानदुखीच्या समस्या सूरु होतात. कानासंबंधीत संसर्गाच्या तक्रारींनीडॉक्टरांकडे गेल्यावर कानांत संसर्ग झाल्याचे निदान होते. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत कान-नाक-घसा सर्जन डॉ. सुश्रृत देशमुख यांनी माहिती दिली आहे.
हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जिवाणू किंवा बुरशी (Bacteria or fungi) वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरते. जिवाणूंमुळे कानासंबंधीत संसर्ग वाढवतो. कानाचा संसर्ग झाला असेल तर वेदनेबरोबरच इतर समस्याही उद्भवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास वेदना वाढु शकतात. पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थांचे सेवन करु नका. त्यामुळे कानाचे दुखणे आणखी वाढू शकते.
संसर्गाची कारणे
सर्दी आणि फ्लू सोबत, अगदी किंचित ऍलर्जीमुळे संक्रमण होऊ शकते. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू हे कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण आहेत. पावसाळ्यात यांची झपाट्याने वाढ होते. पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. यासाठी तुम्ही कोरडे आणि स्वच्छ सुती कापड वापरू शकता.
इअरबड्स आणि कॉटन स्वॅबपासून दूर राहा, कारण ओलसर हवामानात कापसाचे स्वॅब बॅक्टेरिया अडकून तुमच्या कानात पसरू शकतात. इअरफोन्स वेळोवेळी साफ करून, निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. गळ्यात खवखव किंवा घशाचा संसर्ग झाल्यास त्यामुळेही कान दुखणे तसेच संसर्गाचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात कानात ओलावा राहिल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे कान कोरडे आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
लक्षणे कोणती?
कानात वेदना होणे, सूज येणे, लालसरपणा, नीट ऐकु न येणे, कानातून पांढरा , पिवळसर स्राव बाहेर पडणे, कान बंद पडणे, डोकेदुखी
काय उपचार कराल?
कानात वेदना किंवा कान भरलेला, जड जाणवत असेल तर त्याकडे तातडीने लक्ष द्या. लवकरात लवकर ईएनटी डॉक्टरांना दाखवा. वेळीच कानाची साधी तपासणी केल्यास निदान करता येऊ शकते. ऑडिओग्राम करून श्रवणशक्तीमध्ये काही बिघाड झाला असल्यास, कानात द्रव जमा झाला असल्यास त्याची खात्री करून घेता येऊ शकते.