भारतात कोट्यावधी वृद्धांना सतावतोय ‘हा’ आजार, आजूबाजूच्या लोकांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर व्हा सावध
न्यूरोएपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात 31,477 वृद्ध प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशअल इंटेलिजन्स (AI) हे तंत्र वापरले गेले.
नवी दिल्ली : भारतातील 60 किंवा त्याहून अधिक वयाच्या 10 दशलक्ष किंवा एक कोटी पेक्षा जास्त वृद्धांना स्मृतिभ्रंश (dementia)असू शकतो. हे आम्ही नव्हे तर एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. न्यूरोएपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात (study) असे आढळून आले आहे की भारतातील एक कोटीहून (1 crore)अधिक लोकसंख्या स्मृतिभ्रंश आजाराने ग्रस्त आहे. हा आकडा अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये नोंदवलेल्या आकडेवारीच्या बरोबरीचा अथवा समान आहे.
या संशोधनानुसार, सेमी-सुपरव्हाईज्ड नावाचे एक आर्टिफिशअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान 31,477 वृद्ध प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले गेले. संशोधकांना असे आढळून आले की भारतात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण 8.44 टक्के आहे. म्हणजे देशात आत्ता जेवढ्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यामधील जवळपास 1.008 करोड वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हाच दर 8.8 टक्के, यूकेमध्ये 9 टक्के आणि जर्मनी- फ्रान्समध्ये 8.5 ते 9 टक्के आहे.
कसे करण्यात आले डिमेंशियाचे निदान ?
अभ्यासामध्ये वापरलेले AI लर्निंग मॉडेल हे युनिव्हर्सिटी ऑफ सरे, मिशिगन युनिव्हर्सिटी, दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) यासह विविध संस्थांमधील संशोधकांच्या गटाने तयार केले आहे. हे मॉडेल डेटासह विलीन केले गेले. यात नवीन ऑनलाइन एकमताद्वारे स्मृतिभ्रंशाचे (डिमेंशिया) निदान झालेल्यांपैकी सुमारे 70% चा लेबल केलेला डेटासेट समाविष्ट आहे.
डिमेंशियामुळे कोण जास्त प्रभावित ?
डिमेंशिया अथवा स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक धोका वृद्ध, स्त्रिया, अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला. भारतातील वृद्धत्वावर केलेल्या तपासणीत 30,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता, असे या अभ्यासाचे सह-लेखक आणि युनायटेड किंगडममधील सरे युनिव्हर्सिटीतील हाओमियाओ जिन यांनी नमूद केले.
डिमेंशिया म्हणजे नेमके काय ?
डिमेंशिया किंवा स्मृतीभंश यांच्यामध्ये दिसणार्या सामान्य न्यूरोलॉजिकल लक्षणांमध्ये स्मृती कमी होणे (memory loss), संवाद साधण्यात किंवा शब्द सुचण्यात अडचण, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेत कमतरता येणं आणि कठीण कामांचे नियोजन करण्यात आणि ती कामं करण्यात अडचण येणं यांचा समावेश होतो.